करोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यावेळी करोनाचा नवीन उपप्रकार जेए.१ व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. भारतात जेएन.१ बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सातत्याने देशाच्या वेगवेगळ्या भागात जेएन.१ बाधित रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, कर्नाटकात सोमवारी (२५ डिसेंबर) ३४ नव्या जेएन.१ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या शेजारी असलेल्या केरळमध्ये करोनाचा विस्फोट झाला आहे. केरळमध्ये दररोज शेकडो करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. सोमवारी राज्यात ११५ नवीन रुग्ण सापडले.
कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जेएन.१ चे ३४ रुग्ण आढळले आहेत. याबैकी २० रुग्ण एकट्या बंगळुरू शहरात सापडले आहेत. तर चार रुग्ण म्हैसूर आणि तीन रुग्ण मांड्या येथे सापडले आहेत. रामनगर, बंगळुरू ग्रामीण, कोडागू आणि चामराजा नगरमध्ये प्रत्येकी एक जेएन.१ बाधित रुग्ण आढळला आहे. तसेच तीन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत ११५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यातील सक्रीय करोनाबाधित रुग्णांची संख्या १,७४९ वर पोहोचली आहे.
देशभरात रविवारी कोव्हिड-१९ चे ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. माय गव्हर्न्मेंट संकेतस्थळावरील माहितीनुसार सध्या देशात ४,०५४ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. कर्नाटकमध्ये ३,१२८ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात रविवारी ३५ आणि सोमवारी ५० नवे रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यात सध्याच्या घडीला १५३ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण
महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील करोनाची लागण झाली असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून ते करोनावर उपचार घेत आहेत. नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.