IPS Om Prakash : कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश हे त्यांच्या बेंगळुरूमधील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे बेंगळुरुमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ओम प्रकाश यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे ओम प्रकाश यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात कोणाचा सहभाग आहे? याबाबत आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांच्या मृत्यू प्रकरणात आता पोलिसांनी त्यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ओम प्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ओम प्रकाश यांची हत्या झाली आहे का? किंवा कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला? याची माहिती समोर येणार आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

ओम प्रकाश यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा ओम प्रकाश यांचा मृतदेह त्यांच्या तीन मजली घराच्या तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेबाबत आता पोलिसांनी ओम प्रकाश यांच्या पत्नीचीही चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, तसेच पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. ओम प्रकाश यांचा त्यांची पत्नी पल्लवीशी वाद होत असायचा अशी माहितीही समोर येत आहे. यातून त्यांची हत्या झाली का? असाही संशय पोलिसांना आहे. ओम प्रकाश यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे कर्नाटक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ओम प्रकाश हे कर्नाटक केडरमधील १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ओम प्रकाश यांनी २०१५ मध्ये त्यांनी कर्नाटकचे डीजीपी म्हणून काम पाहिलेलं आहे. डीजीपी आणि पोलीस महानिरीक्षक म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता.