मैसुरू : निवडणूक जाहीरनाम्यातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू केली. यानुसार राज्यातील सुमारे १.१ कोटी महिलांना दर महिन्याला २ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत महाराजा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ‘गृहलक्ष्मी’ची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच प्रमुख हमी योजनांपैकी ही एक आहे. काँग्रेसने मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून राज्यात सत्ता स्थापन केली. सिद्धरामय्या यांनी सांगिले की, काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांपैकी शक्ती, गृहज्योती आणि अन्न भाग्य या तीन योजना याआधीच सुरू केल्या आहेत. ‘गृहलक्ष्मी’ ही चौथी योजना आहे.
हेही वाचा >>> जम्मू-काश्मीरच्या ‘भद्रवाह राजमा’, ‘सुलाई मधा’स भौगोलिक मानांकन
‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी सरकारने चालू अर्थसंकल्पात १७५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पाचवी हमी योजना ही युवा निधी आहे. ती डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
कर्नाटकमधील कामाची देशभरात पुनरावृत्ती- राहुल गांधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रमुख आश्वासनांची काँग्रेसने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने केलेल्या कामांची आता देशात पुनरावृत्ती करण्यात येईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आम्ही आमच्या आश्वासनांवर ठाम आहोत. आम्ही कधीही खोटे आश्वासन देत नाही, असेही ते म्हणाले.