बंगळूरु : कर्नाटकातील आधीच्या भाजप सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संबंधित संस्थांना शेकडो एकर जमीन दिली होती. त्याचा आम्ही फेरआढावा घेऊ, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडु राव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच भाजप सरकारने जारी केलेल्या काही निविदा रद्द करण्यात आल्या असून अन्य काही निविदांची तपासणी केली जात आहे, असेही राव यांनी सांगितले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राव म्हणाले की, ‘संघ आणि संघ परिवारातील संस्थांना शेकडो एकर सरकारी जमीन देण्यात आली आहे. या संस्थांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा प्रसार व्हावा या उद्देशाने ही जमीन देण्यात आली होती. हे होता कामा नये. जनतेला याबद्दल सगळी माहिती मिळाली पाहिजे. काहीही गोपनीय ठेवता कामा नये. सर्व काही एका संस्थेला देऊन टाकणे योग्य नाही. त्यामुळे आम्हाला ही पावले उचलावी लागत आहेत.’ ते म्हणाले की, ‘हे सरकारी पातळीवर करावे लागेल. महसूल खाते आणि मुख्यमंत्र्यांना काय आणि कसे घडले त्यामध्ये लक्ष घालावे लागेल. जमिनीचे वाटप कायद्यानुसार झाले का याचा निर्णय घ्यावा लागेल, तसेच त्यासाठी किती दर आकारण्यात आला हेही तपासावे लागेल.’