कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभाग येथे संचालकपदी नियुक्ती झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते सीबीआयचे संचालक असणार आहेत. या पदाच्या नियुक्तीसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश होता.

सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या संचालकाची निवड करण्याकरता उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. या समितीद्वारे दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी अधिकाऱ्याची निवड केली जाते. हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. या समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची निवड केली होती. त्यामधून कर्नाटकचे १९८६ बॅचचे अधिकारी प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader