भारतीय जनता पक्षाने वादग्रस्त नेता सूरज पाल अमू यांचा राजीनामा फेटाळला आहे. पद्मावत चित्रपटावेळी वाद निर्माण करणाऱ्यांमध्ये सूरज पाल अमू यांचा सहभाग होता. सूरज पाल अमू यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस जाहीर केलं होतं. पक्षात पुन्हा घरवापसी झालेल्या सूरज पाल अमू यांनी पुन्हा आपल्या घरी आल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी काही महिन्यांपूर्वीच भाजपाच्या हरियाणा युनिटमधील अनेक पदांचा राजीनामा दिला होता. आज मला हरियाणामधील प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी राजीनामा फेटाळण्यात आल्याचं कळवलं आहे. मी गेल्या २९ ते ३० वर्षांपासून पक्षात वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे. मी विद्यार्थी संघटनेतही होतो. गेल्या आठ महिन्यांपासून मी पक्षापासून दूर असून, हे माझ्यासाठी खपू त्रासदायक होतं. मात्र या दरम्यान मी काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम करत होतो. आता मला पुन्हा घरी आल्यासारखं वाटत आहे’, असं सूरज पाल अमू यांनी सांगितलं आहे.

करणी सेनेचे प्रमुख असणारे सूरज पाल अमू यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये आपल्या मुख्य माध्यम समन्वयक पदाचा राजीनामा दिला होता. प्रदेशाध्यक्षांनी पद्मावत चित्रपटावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

जानेवारी महिन्यात गुरुग्राम पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणत असल्याचा आरोप करत त्यांना अटक केली होती. नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. पद्मावत चित्रपटात इतिहासाशी छेडछात करत राणी पद्मिनिची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत अनेक संघटनांनी चित्रपटाला विरोध करत आंदोलन केलं होतं.