महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूक पार पडते आहे. यासाठी भाजपाने तीन उमेदवार दिले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी मंगळवारीच भाजपात प्रवेश केला ते अशोक चव्हाण, पुण्यातल्या निष्ठावंत कार्यकर्त्या मेधा कुलकर्णी आणि भाजपाचे नांदेडचे नेते डॉ. अजित गोपछडे या तीन नावांचा यामध्ये समावेश आहे. या तिघांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन केलं जातं आहे अशी चर्चा आहे. तसंच दुसरीकडे अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार हे निश्चितच मानलं जात होतं. त्यामुळेच त्यांचा पक्षप्रवेश १५ ऐवजी १३ फेब्रुवारीला करण्यात आला या चर्चाही रंगल्या होत्या. अशात आता डॉ. अजित गोपछडे कोण आहेत? याची चर्चा रंगली आहे. कारण हे नाव महाराष्ट्राला फारसं परिचित नाही.

अजित गोपछडे भाजपाच्या डॉक्टर सेलचे प्रमुख

अजित गोपछडे हे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. राम मंदिराच्या आंदोलनात त्यांनी कारसेवाही केली आहे. पेशाने डॉक्टर असलेले अजित गोपछडे हे नाव भाजपाच्या व्यतिरिक्त लोकांना फारसे माहीत नाही. भाजपाच्या डॉक्टर्स सेलचे ते प्रमुख आहेत. अजित गोपछडे यांनी भाजपाच्या माध्यमातून अनेक भागांमध्ये वैद्यकीय शिबीरं आयोजित केली आहेत. करोना काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अशी काहीही शक्यता किंवा चर्चाही नव्हती. पण भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करुन अजित गोपछडेंना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

हे पण वाचा- भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेल्या मेधा कुलकर्णी कोण आहेत? त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा का होते आहे?

कोण आहे अजित गोपछडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असलेले बालरोगतज्ज्ञ अशी अजित गोपछडे यांची मुख्य ओळख.

अजित गोपछडे हे मुळचे कोल्हे बोरगाव, तालुका बिलोली येथील असून त्यांचे वडील माधवराव गोपछडे आणि त्यांचे काका गोविंदराव गोपछडे हे आहेत.

नांदेडच्या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या अजित गोपछडेंवर लहानपणापासूनच समाजकार्याचे संस्कार झाले.

अजित यांनी त्यांचं १२ वी पर्यंतचं शिक्षण हे नांदेडच्या यशवंराव महाविद्यालयात घेतलं आहे. तर एमबीबीएसची पदवी ही त्यांनी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात घेतली आहे.

महाविद्यालयात असताना चळवळींचं नेतृत्व

अजित गोपछडे यांनी महाविद्यालयीन काळात मार्डच्या चळवळींचं नेतृत्व केलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह त्यांनी काम केलं आहे. तसंच नितीन गडकरी यांच्यासह त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचंही काम केलं आहे. नांदेडला पुन्हा आल्यानंतर त्यांनी अमृतपथ हे बालरुग्णालय सुरु केलं. त्यांच्या पत्नी डॉ. चेतना गोपछडे या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असलेल्या अजित गोपछडेंनी आत्तापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आता राज्यसभेची उमेदवारी त्यांना देण्यात आली आहे. एक कारसेवक ते राज्यसभेचे उमेदवार हा त्यांचा प्रवास नक्कीच महत्त्वाचा आहे.

Story img Loader