माजी मंत्री पी.चिदंबरम यांचा आरोप
‘कार्ती हा माझा मुलगा आहे म्हणून त्याला लक्ष्य केले जात असले तरी खरे लक्ष्य ‘मी’ आहे, असे सांगून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी परदेशात मोठी अघोषित मालमत्ता असल्याचा आरोप फेटाळून लावला. माजी मंत्री चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याची परदेशात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करून संसदेत दोन दिवस अद्रमुक व बिजू जनता दलाच्या सदस्यांनी गोंधळ केला होता व या प्रकरणी चौकशीची मागणीही केली होती.
चिदंबरम म्हणाले, की जर कार्तीची परदेशात मोठी अघोषित मालमत्ता आहे असे सरकारला वाटते तर त्यांनी त्याची यादी जाहीर करावी. नंतर माझा मुलगा स्वेच्छेने नाममात्र एक रुपये मूल्यात ही मालमत्ता सरकारकडे हस्तांतरित करेल. कार्ती याच्या नावावर परदेशात मोठी मालमत्ता असल्याचे आरोप केले जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर चिदंबरम यांनी सांगितले, की कार्तीच्या विरोधात बेछूट, बिनबुडाचे आरोप करण्यात आले.
ते आरोप खरे तर माझ्यावर आहेत. या आरोपांमागे एक रचलेली कथा आहे. त्यात तथ्य नाही. जर सरकारला कार्ती चिदंबरमची परदेशात मोठी अघोषित मालमत्ता आहे असे वाटत असेल तर त्यांनी त्याची यादी जाहीर करावी. एक रुपयात आम्ही ही मालमत्ता सरकारला देऊन टाकू. कार्ती चिदंबरम यांनी बरीच स्थावर मालमत्ता जमवली आहे व चौदा देशांत त्यांचे उद्योग आहेत. सक्तवसुली संचालनालयाने टाकलेले छापे व एअरसेल मॅक्सिस घोटाळय़ात प्राप्तिकर विभागाने केलेली चौकशी यात त्याबाबत कागदपत्रे सापडली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा