पक्षशिस्त पाळलीच पाहिजे अशा शब्दांत द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी आपले पुत्र एम. के. अळगिरी यांना डीएमडीकेवरील युतीबाबतच्या वक्तव्यावरून फटकारले. पक्षाची भूमिका मान्य केली नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नेतृत्वावरून अळ्ळगिरी आणि त्यांचे बंधू एम. के. स्टॅलीन यांच्यात सुप्त वाद आहे. द्रमुकने डीएमडीकेबरोबर युती करण्यास अनुकूलता दाखवल्यावर त्यावर अळागिरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर हा वाद वाढला. युतीबाबतचा निर्णय पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा नेतृत्व घेईल, त्यावर कुणी बोलू नये असा इशारा करुणानिधी यांनी दिला. अळागिरी यांनी यापूर्वी डीएमडीकेशी युती करण्यास अनुकूलता दर्शवली होती. मात्र आता अचानक त्याच्या विरोधात पवित्रा घेतल्याने करुणानिधी नाराज झाले आहेत.
पक्षशिस्त मोडणारे कुणीही असोत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशा इशारा करुणानिधींनी दिला आहे. माध्यमातील काही जण आमच्या संभाव्य आघाडीला विरोध करत असल्याचा दावा करुणानिधींनी केला. द्रमुकमध्ये स्टॅलीन आणि अळागिरी यांच्यात नेतृत्वावरून संघर्ष सुरू आहे. मात्र ९० वर्षीय करुणानिधी यांनी वेळोवेळी आपले वजन स्टॅलीन यांच्या पारडय़ात टाकले आहे. त्यामुळे अळागिरी अस्वस्थ आहेत. तमिळनाडूच्या दक्षिणेकडील भागात अळागिरी यांचे पक्ष संघटनेत प्राबल्य आहे. २०११ मध्ये द्रमुकचा राज्यात पराभव झाल्यानंतर अळागिरी काहीसे शांत आहेत. मात्र डीएमडीकेशी युतीच्या मुद्दय़ावरून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे मानले जात आहे.

Story img Loader