द्रमुक पुढील निवडणुकीत भाजपशी आघाडी करणार असल्याच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताचे पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी सपशेल खंडन केले. सध्या आघाडीत जे घटक पक्ष आहेत त्यांच्या समवेतच लोकसभेच्या निवडणुका लढविण्यात येणार असल्याचेही करुणानिधी यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत जे मत व्यक्त करण्यात आले त्याच्याशी दुरान्वयेही संबंध नसलेले वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. आपल्या इच्छेनुसार प्रसारमाध्यमांनी वृत्त देऊ नये कारण ही कृती केवळ खेदजनकच नाही तर निंदनीय आहे, असे मत पक्षाचे कोषाध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी व्यक्त केल्यानंतर करुणानिधी यांनी ही बाब स्पष्ट केली.
पुढील निवडणुका द्रमुक स्वबळावर लढणार का, असे विचारले असता करुणानिधी म्हणाले की, यापूर्वीच आम्ही काही पक्षांशी आघाडी केली आहे. मुस्लीम लीग, विदुथलाई चिरुथआईगल कटची, मणिधानेय मक्कल कटची आणि पुथिया थामिळगम यांच्याशी द्रमुकची आघाडी असून त्यांच्यासमवेतच निवडणुका लढविण्यात येतील, असेही ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे त्याबाबत भाष्य करण्यास करुणानिधी यांनी नकार दिला. सर्व पक्षांबाबत विचार केल्यानंतर आम्ही पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या मतांशी ठाम राहण्याचे ठरविले आहे, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
द्रमुकची भाजपशी आघाडी नाही!
द्रमुक पुढील निवडणुकीत भाजपशी आघाडी करणार असल्याच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताचे पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी सपशेल खंडन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-12-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karunanidhi rules out alliance with bjp for 2014 lok sabha elections