जयललितांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करण्यावरून करुणानिधींची टीका
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करण्याचा डाव्या पक्षांनी प्रयत्न सुरू केला असून त्यावर द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी टीका केली आहे. डाव्यांचा हा प्रयत्न म्हणजे संधिसाधू गुलामगिरी आहे, अन्य काहीही नाही, असे करुणानिधी यांनी म्हटले आहे.
जयललिता यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याबद्दल खटला सुरू आहे त्यामुळे त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करणे म्हणजे संधिसाधू गुलामगिरीच आहे, असे करुणानिधी यांनी वार्ताहरांना सांगितले. राज्यात विधानसभेच्या आगामी निवडणुकीनंतर सत्ताबदल अपरिहार्य असून लोकसभेच्या निवडणुका या त्याची पूर्वतयारी आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढील पंतप्रधान कोण, हा प्रश्न निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतरच उद्भवेल, असे जयललिता यांनी म्हटले आहे. तामिळनाडूतील सत्तारूढ अभाअद्रमुकने लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या पक्षांशी आघाडी केली आहे.
करुणानिधी यांची कन्या कनिमोळी यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली त्यामुळे द्रमुक काँग्रेसशी आघाडी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत विचारले असता करुणानिधी यांनी ती सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले.
तामिळी जनतेच्या भावना, संवेदना आणि ऐक्य यांचा आदर करणाऱ्या पक्षाशी द्रमुक निवडणूक आघाडी करील, त्याचप्रमाणे देशाचे ऐक्य, धर्मनिरपेक्षता आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यालाही आम्ही महत्त्व देतो, असेही ते म्हणाले. दुसऱ्याचा आदर करणे, हेच द्रमुकचे मुख्य धोरण असून लोकसभेच्या निवडणुकीत युती करतानाही त्याच धोरणाचा आधार घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
डीएमडीकेचे विजयकांत यांचाही या धोरणाला अपवाद करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करणाऱ्या करुणानिधी यांनी  द्रमुक-काँग्रेस-डीएमडीकेची आघाडी अस्तित्वात येईल असे कोणतेही संकेत नसल्याचे, म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा