Kash Patel sworn: भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक काश पटेल यांनी फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयचे नववे संचालक म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. वॉश्गिंटन येथील व्हाईट हाऊस संकुलातील आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस इमारतीमधील इंडियन ट्रीटी दालनात अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या देखरेखीखाली हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. एफबीआय संचालक म्हणून काश पटेल यांचा कार्यकाळ हा १० वर्षांचा असेल. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांची जागा काश पटेल यांनी घेतली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची कौतुकाची थाप
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांचे याआधी कौतुक केले होते. एफबीआय एजन्ट्सकडून त्यांना पाठिंबा मिळाला असल्याचेही ट्रम्प म्हणाले. “काश मला आवडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सर्व एजंट्सना त्याच्याप्रती असलेला आदर”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, काश पटेल आतापर्यंतचा सर्वोत्तम संचालक म्हणून ओळखला जाईल. तो एक अतिशय मेहनती आणि कणखर व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे. त्याच्या स्वतःच्या भूमिका आहेत. ट्रे गौडी यांनी म्हटले होते की, काश पटेल एक अविश्वसनीय असा व्यक्ती आहे. जेव्हा ट्रे गौडी यांनीच अशी प्रशंसा केल्यानंतर इतर कुणालाच शंका घेण्याचे काही कारण उरत नाही. एका आदरणीय व्यक्तीमत्त्वाने काश यांच्याबद्दल केलेले, हे सर्वात मोठे विधान आहे.
दरम्यान अमेरिकेच्या संसदेने गुरूवारी काश पटेल यांच्या नियुक्तीला ५१ – ४९ मतांनी हिरवा झेंडा दाखविला होता. रिपब्लिकन पक्षाचे खासदार सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी काश पटेल यांच्या नियुक्तीला विरोध करत डेमोक्रॅटीक पक्षाची साथ दिली. त्यामुळे ५१ मतांनी त्यांची निवड झाली.
कोण आहेत काश पटेल?
काश पटेल यांचे भारताशी खास नाते राहिले आहे. त्यांचे आई-वडील हे गुजरातहून न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटी येथे स्थायिक झाले होते. दोघे आधी कॅनडा येथे राहिले नंतर १९७० मध्ये अमेरिकेत गेले. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या फटेल यांनी आपल्या गुजराती ओळख कायम अभिमानाने जाहीर केली आहे. काश पटेल यांनी रिचमंड विद्यापीठ आणि पेस यूनीव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ येथून कायद्याची पदवी घेतली आहे. पटेल यांनी २०१७ मध्ये तात्कालीन ट्रम्प प्रशासनात शेवटचे काही दिवस चीफ ऑफ स्टाफ म्हणून देखील काम केले होते.