वाराणसी : काशी आणि तमिळनाडू ही संस्कृती आणि विकासाची कालातीत केंद्रे आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गौरव केला. हे दोन प्रदेश जगातील सर्वात जुन्या अशा संस्कृत आणि तमिळ भाषांची केंद्रे आहेत, असेही गौरवोद्गार त्यांनी शनिवारी ‘काशी तमिळ संगम’च्या उद्घाटनप्रसंगी काढले.
पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात संगमांचा मोठा महिमा आणि महत्त्व आहे. नद्या आणि प्रवाहच्या संगमापासून विचार आणि विचारधारा, ज्ञान- विज्ञान आणि समाज संस्कृतींच्या प्रत्येक संगमाला आपण साजरे केले आहे. हा उत्सव वास्तविक भारताच्या विविधता आणि विशेषत्वाचा उत्सव आहे. त्यामुळेच काशी तमिळ संगम हा विशेष आणि अद्वितीय आहे, असेही ते म्हणाले.
काशीमध्ये बाबा विश्वनाथ आहेत. तर, तमिळनाडूमध्ये भगवान रामेश्वराचे आशीर्वाद आहेत. काशी आणि तमिळनाडू दोन्ही शिवमय आहेत. एक स्वयंकाशी आहे, तर, दुसरे दक्षिण काशी आहे, असे मोदी म्हणाले.‘काशी तमिळ संगम’ परिषद एक महिनाभर सुरू राहणार आहे. यानिमित्त तमिळनाडूतील अडीच हजार शिष्टमंडळे वाराणसीत दाखल होणार असून येथील समव्यावयायिकांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या एक भारत- श्रेष्ठ भारत उपक्रमा अंतर्गत ही परिषद भरविली आहे.