लेफ्टनंट जनरल एन. एस. ब्रार यांचे वक्तव्य
भारताचा १९६२च्या चीन युद्धात पराभव झाल्यानंतर कच्छ सीमेवरचा भाग काही काळ अलग पडल्याचा फायदा उठवत पाकिस्तानने जबरदस्तीने काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न १९६५च्या युद्धावेळी केला होता व त्यात काश्मीरच्या राजकीय प्रश्नावर लष्करी कारवाई करून तोडगा काढण्याचा त्यांचा इरादा होता, असे लेफ्टनंट जनरल एन. एस. ब्रार यांनी म्हटले आहे.
त्यांचे ‘ड्रमर्स कॉल’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की भारत व पाकिस्तान यांच्यातील १९६५चे युद्ध हे निर्णायक होते. ‘बॅटल ऑफ असल’ म्हणजे सडतोड उत्तराची लढाई असलेल्या त्या युद्धात भारताला निर्णायक विजय संपादन करता आला. १९६२ मध्ये चीनविरोधातील लढाईत भारताला हार पत्करावी लागली, त्याचा फायदा उठवत पाकिस्तानने एप्रिल मे १९६५ मध्ये कच्छ भागात घुसखोरी केली. भारताने त्या वेळी कच्छ सीमेबाबत तीनसदस्यीय आंतरराष्ट्रीय लवाद नेमण्यास मान्यता दिली, त्यामुळे पाकिस्तानचे दु:साहस वाढले व त्यांनी बळाच्या आधारे काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
चीन युद्धानंतर भारतीय लष्कर पुरेशा सुसज्ज स्थितीत नाही, ते आपल्यापुढे टिकू शकणार नाही या समजातून पाकिस्तानने काश्मीरचा राजकीय प्रश्न लष्करी मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पाकिस्तानकडे अमेरिकी शस्त्रे होती. त्यामुळे त्यांनी ८ सप्टेंबरला भारतीय प्रदेशात प्रवेश केला व खेम करण हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून ५ कि.मी अंतरावरचा भाग ताब्यात घेतला. भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देऊन १० सप्टेंबरला कळसाध्याय गाठत पाकिस्तानला चिरडले. पाकिस्तानचे सैन्य यात गारद झाले. पॅटन रणगाडे भारताने उद्ध्वस्त केले. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्या युद्धात भाग घेतला होता. पाकिस्तानने त्या युद्धात ९७ रणगाडे गमावले. त्यांचे अनेक अधिकारी मारले गेले. ‘ड्रमर्स कॉल’ हे पुस्तक ब्राउजरने प्रसिद्ध केले आहे.