पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार म्हणजे भारता विरोधात आग ओकणारी भाषणे, या समीकरणाला प्रथमच छेद गेला असून यंदाच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत काश्मीरचा मुद्दाच गायब असल्याचे दिसत आहे.
सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात काश्मीर प्रश्नाचा उल्लेख आहे पण प्रचारात काश्मीर अथवा भारत यांचा उल्लेखही होताना दिसत नाही. यंदाच्या निवडणुका या दहशतवाद्यांच्या धमक्यांच्या सावटाखाली होत असून लोकशाही की दहशतवाद्यांच्या जोखडाखालील हुकूमशाही, हा महत्त्वाचा मुद्दा प्रथमच ऐरणीवर आला आहे. त्यामुळे लोकांच्या नित्य जीवनातील प्रश्नांना प्रथमच या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्थान दिले आहे. जाहीरनाम्यात काश्मीरचा उल्लेख असला तरी भारताबरोबर संबंध सुधारण्याचीही भाषा केली आहे. इतकेच नव्हे तर अतिरिक्त वीज भारताला विकण्याची हमीही पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज गट)च्या जाहीरनाम्यात आहे.
पाकिस्तान राष्ट्रीय असेंब्लीच्या ३४२ जागांपैकी २७२ जागांसाठी या ११ मे रोजी मतदान आहे. उरलेल्या जागा या विविध कोटय़ानुसार भरल्या जाणार आहेत.
      मतदारांसाठी आपण काय केले आहे आणि निवडून आलो तर काय करू, हे सांगण्यावर यावेळी उमेदवारांचा भर आहे. या चौकटीत भारत किंवा काश्मीरबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही.                                                                      
लतिफ खोसा, ज्येष्ठ नेते पाकिस्तान पीपल्स पार्टी