एक्स्प्रेस वृत्त, मुंबई

‘काश्मीर फाइल्स’ हा प्रचारपट असल्याच्या नादाव्ह लापिड यांच्या विधानाशी इफ्फीचे (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) आपल्यासह आणखी दोन परीक्षक सहमत असल्याचे इफ्फीच्या पाच सदस्यीय परीक्षक मंडळावरील जिंको गोटोह यांनी म्हटले आहे. त्या बाफ्टा (ब्रिटिश ॲकेडमी ऑफ फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन आर्टस) पुरस्कार विजेत्या आहेत.

शनिवारी त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, इफ्फीचे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष लापिड यांनी समारोप समारंभात बोलताना काश्मीर फाइल्स हा प्रचारपट असल्याचे मत हे परीक्षक मंडळाचे मत म्हणून मांडले होते. अशा या कलात्मक महोत्सवात पंधराव्या क्रमांकावर दाखविलेला काश्मीर फाईल्स हा बटबटीत प्रचारी थाटाचा चित्रपट पाहून आम्हाला धक्का बसला. या महोत्सवात त्याचा समावेश अयोग्य होता. मी आणि अन्य दोघेजण लापिड यांच्या मताशी सहमत आहोत. आमचे हे मत म्हणजे या चित्रपटात जे दाखविले आहे, त्यावरील राजकीय मत नाही, तर केवळ कलात्मक दृष्टिकोनातून मांडलेला विचार आहे. चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी होणे आणि त्यानंतर नादाव्ह यांच्यावर वैयक्तिक टीकेचे हल्ले होणे हे दु:खद आहे. आम्हा परीक्षकांचा तसा उद्देश नव्हता.

इफ्फीचे परीक्षक फ्रान्सचे चित्रपट निर्माते- पत्रकार जाव्हीर ॲन्ग्युलो बार्तुरेन आणि फ्रेंच चित्रपट संकलक पास्कल चाव्हान्स यांनीही आपण लापिड यांच्याशी सहमत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Story img Loader