जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा समावेश
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा व बडगाम जिल्ह्यांमध्ये रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका स्वयंघोषित शीर्षस्थ कमांडरसह ५ दहशतवादी ठार झाले.
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख झाहीद वानी हा २०१७ पासून सक्रिय होता आणि काश्मीर खोऱ्यातील अनेक हत्या तसेच युवकांची दहशतवादी संघटनेत भरती करणे यांत त्याचा सहभाग होता.
पुलवामा व बडगाम जिल्ह्यांमध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे शोधमोहीम सुरू केली असता चकमकींना तोंड फुटले. पुलवामाच्या नायरा भागातील चकमकीत जैशचे ४ दहशतवादी मारले गेले, तर मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्याच्या चराच-ए-शरीफ भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार आणि लष्कराच्या व्हिक्टर फोर्सचे कमांडिग अधिकारी मेजर जनरल प्रशांत श्रीवास्तव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
’’झाहीद वानी हा जैशचा शीर्षस्थ कमांडर होता. जम्मूतील बन प्लाझा येथे झालेल्या हल्ल्यात त्याचा भाऊ सहभागी होता व तो सध्या तुरुंगात आहे. २०१७ सालापासून सक्रिय असलेला वानी अनेक हत्या आणि दहशतवादी भरतीमध्ये सहभागी होता. समीर दार याच्या हत्येनंतर तो जैश-ए-मोहम्मदचा जिल्हा कमांडर बनला. वास्तविकत: तो संपूर्ण काश्मीर खोऱ्यासाठी जैशचा प्रमुख होता. ही मोहीम अतिशय यशस्वी ठरली असून मी त्यासाठी सुरक्षा दलांचे अभिनंदन करतो’, असे कुमार म्हणाले.
या महिन्यात आतापर्यंत ११ चकमकी झडल्या असून त्यात ८ पाकिस्तानींसह २१ दहशतवादी मारले गेले आहेत, असेही पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.
२०१७ पासून झालेल्या अनेक आयईडी हल्ल्यांचा वानी हा सूत्रधार होता. तरुण मुलांची त्याने मोठ्या प्रमाणात दहशतवादी संघटनेत भरती केली होती. या यशामुळे, या भागात जैशचा धोका नाहीसा करण्यात आम्ही मोठे पाऊल उचलले आहे, असेही कुमार म्हणाले.