अमेरिकी अवकाश संस्था नासाने काश्मीर खोऱ्यातील १८ विद्यार्थ्यांना नासाभेटीचे निमंत्रण दिले आहे. ११ दिवसांच्या या भेटीदरम्यान काश्मिरी विद्यार्थी नासाच्या नामवंत वैज्ञानिकांशी चर्चा करून अवकाश संशोधनाबाबतची मौलिक माहितीही जाणून घेतील.
काश्मीर खोऱ्यातील ग्रीन व्हॅली एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथील ऑरेंज ग्रुप ऑफ एज्युकेशनतर्फे आयोजित केलेल्या नासा अ‍ॅस्ट्रॉनॉमी ऑलिंपियाड २०१२ मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या आणि सुवर्ण तसेच रौप्य पदक पटकावलेल्या सुमारे १८ विद्यार्थ्यांना नासाने भेटीचे निमंत्रण दिले असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. विविध भागातील विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्तम यंत्रणा आणि सोयीसुविधांचा एकत्र येऊन अनुभव घेण्याची तसेच निष्णात वैज्ञानिकांशी चर्चा करण्याची संधी मिळावी यासाठी नासातर्फे नेहमी अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गत ५वी ते ११वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येते. त्यानुसार काश्मीर येथील शाळेतील ही मुले लवकरच नासासाठी रवाना होतील.   

Story img Loader