Kashmir Terrorist Attack Sanjay Raut Criticize Modi Govt : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. बैसरन येथील पर्यटनस्थळी नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. मात्र, तिथे सुरक्षारक्षक नसल्यामुळे दहशतवाद्यांनी संधीचा फायदा घेत थेट पर्यटकांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत म्हणाले, “पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशभरातील पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जण होते. मोदी सरकारने काश्मीरवर स्वतःचं नियंत्रण ठेवण्यासाठी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवलं, जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं. त्यामुळे काल पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे.”

संजय राऊतांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “अमित शाहांसाठी शेकडो सशस्त्र जवान श्रीनगरमध्ये होते, मात्र सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक नव्हता. हे सगळं का झालं? कारण मोदी सरकारने भारतीय सैन्यदलातील दोन लाख रिक्त पदे भरलेली नाहीत. संरक्षण विभागाच्या बजेटमध्ये त्यांनी कपात केली आहे. संरक्षण विभागासाठी वापरले जाणारे पैसे मोदी सरकारने ‘लाडली बहन योजने’सारख्या थेट पैसे देणाऱ्या योजनांवर वळवले आहेत.”

भारतीय सैन्यातील दोन लाख पदे रिक्त : संजय राऊत

खासदार राऊत म्हणाले, “हा हल्ला म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांचं (अमित शाह) अपयश आहे. पहलगाममध्ये दोन-तीन हजार पर्यटक होते. मात्र तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. मात्र, अमित शाह श्रीनगरमध्ये उतरले तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी ७५ गाड्यांचा ताफा होता. ५०० हून अधिक सशस्त्र पोलीस होते. त्यांच्याबरोबर बॉम्बस्क्वाड देखील होता. एका व्यक्तीसाठी इतकी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. मात्र सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक नव्हता. हे सगळं का झालं? कारण मोदी सरकारने भारतीय सैन्यदलातील दोन लाख रिक्त पदे भरलेली नाहीत. संरक्षण विभागाच्या बजेटमध्ये त्यांनी कपात केली आहे. संरक्षण विभागासाठी वापरले जाणारे पैसे मोदी सरकारने त्यांच्या इतर योजनांवर वळवले आहेत. असं करून हे मोदी सरकार आपल्या सर्वांच्या सुरक्षेशी खेळतंय.”

काश्मीरमधील दहशतवाद वाढतोय : राऊत

राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपेल. मात्र त्याच्या उलट घडतंय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद वाढतोय. मोदी-शाह संसदेत आपल्या सर्वांशी खोटं बोलत आहेत.”