अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात अतिरेकी कारवाया वाढण्याची शक्यता आणि एकंदरीतच जम्मू-काश्मीर प्रांतातील परिस्थिती लक्षात घेता येथील ‘लष्करी विशेषाधिकार’ कमी करण्यात येऊ नयेत, असे मत लष्करप्रमुख विक्रम सिंग यांनी व्यक्त केले आह़े  येथे लागू असलेल्या लष्करी विशेषाधिकार कायद्यात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्याला २०१४ मध्ये अफगाणिस्तानात होणाऱ्या घडामोडी विचारात घ्यायला हव्यात, असेही ते येथे म्हणाल़े
१५ जानेवारी रोजी ‘भूदल दिना’निमित्त होणाऱ्या समारंभाच्या पाश्र्वभूमीवर नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े  लष्कराच्या दृष्टिकोनातून सध्याच्या काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा विचार करता, आपण काही काळ वाट पाहून परिस्थिती बिघडते, चिघळते की सुधारते याचा अंदाज घ्यायला हवा आणि त्यानंतरच ‘विशेषाधिकारा’बाबत निर्णय घ्यावा़  अफगाणिस्तानातील घडमोडींबाबत आणि त्याच्या भारतावर होणाऱ्या परिणामांबाबत आमच्या हाती काही माहिती आलेली आह़े  त्यामुळे आपल्याला सतर्क राहायला हवे, असेही त्यांनी सांगितल़े
‘आप’चे नेते प्रशांत भूषण यांच्या या संदर्भातील वक्तव्यावर मात्र कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला़  ‘मी राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावर कधीही भाष्य करीत नाही़  जम्मू-काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आह़े  त्यामुळे तेथे आपण राष्ट्राच्या धोरणांची अंमलबजावणी करीत आहोत आणि लष्कर त्यात त्यांची भूमिका बजावीत आह़े  मात्र मानवाधिकाराच्या उल्लंघनाबाबत येथे कोणतीही तडजोड करण्यात येत नाही़  मायभूमीच्या कायद्यांबाबत आम्हाला पूर्ण आदर आहे आणि त्यांचे पालन आम्ही पूर्ण निष्ठेने करतो, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केल़े

Story img Loader