श्रीनगर : काश्मीरचे प्रसिद्ध कवी व काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे सोमवारी येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. येथील नौशेरा भागातील आपल्या राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाले.
६ मे १९२५ रोजी जन्मलेल्या प्रा. राही यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. इतर भाषांतील काही नामांकित कवींच्या कवितांनाही त्यांनी काश्मिरी भाषेत अनुवादित केले. २००७ मध्ये त्यांना ‘सियाह रूद ज़रीन मंज़’ (इन ब्लॅक ड्रिझल) या काव्यसंग्रहासाठी देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान- ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
प्रा. राही यांना १९६१ मध्ये त्यांच्या ‘नवरोज़-ए-सबा’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी बाबा फरीद यांच्या रचनांचा काश्मिरी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांच्या प्रारंभीच्या रचनांवर दीनानाथ नदीम यांचा प्रभाव होता. त्यांना राज्यातील विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ‘ट्वीट’संदेशात नमूद केले, की काश्मिरी भाषेतील विद्यमान सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक असलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. रेहमान राही यांचे निधन झाल्याबद्दल खूप दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला.