राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे जम्मूमध्ये पोहचले आहेत. यावेळी काश्मीरी पंडितांच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला.
यावेळी संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊ आणि तुम्हाला जे वचन देण्यात आलं होतं, त्याची त्यांना आठवण करून देऊ. तुम्ही सर्वांनी देशासाठी जेवढं सहन केलंय, तेवढं कदाचितच कुणी केलं असेल. तुमच्या संघर्षात महाराष्ट्र, शिवसेना आणि ठाकरे परिवार तुमच्यासोबत पहाडाप्रमाणे उभा राहील.”
याचबरोबर, “या मुद्द्य्यावर संसदेत चर्चा व्हावी यासाठी आम्ही हा मुद्दा संसदेत उपस्थित करू. जे मोदी सरकार सत्तेत आलं आहे, २०१४ मध्ये तर सर्वात मोठा मुद्दा काश्मीरचाच होता. त्यावरच लोकांनी मत दिलं. तेव्हा जे सांगितलं होतं की आम्ही पीओके घेऊन येऊ. ते नंतर बघा अगोदर इथे जे काश्मिरी पंडित बसलेले आहेत, त्यांचा जीव वाचवा. त्यांची जी छोटीशी मागणी आहे की, जम्मूमध्येच त्यांना ठेवा आणि रोजगार उपलब्ध करा. त्यांच्या मुलाबाळांना सुरक्षित ठेवा. ही छोटीशी मागणी काश्मिरी पंडितांची तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत, तर पीओके बद्दल तुम्ही का बोलतात?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.
तुम्ही पुन्हा एकदा राजकारण करू इच्छित आहात? –
याशिवाय, “२०१४ ची जी निवडणूक झाली त्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा हा काश्मिरी पंडिताचा होता आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचा होता. मी मानतो की काश्मिरी पंडितांचे जेवढे रक्त या देशात वाहले आहे, आजही आमच्या समोर तो आक्रोश, आकांत आहे, आम्ही तो विसरू शकत नाही. परंतु सरकार कसं काय विसरलं?. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी, उपराज्यपालांनी इथे येऊन यांचं म्हणणं तरी ऐकायला हवं. माणुसकीच्या नात्याने ऐका. तुम्ही पुन्हा एकदा राजकारण करू इच्छित आहात?, पुन्हा एकदा त्यांच्या नावावर निवडणूक लढू इच्छित आहात, हे चुकीचं आहे.” असंही संजय राऊतांनी म्हणत भाजपावर टीका केली.
आता तर काँग्रेसचं सरकार नाही, दिल्लीत आणि इथेही तुमचं सरकार आहे मग… –
“हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे देशातील पहिले नेते होते, ज्यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा उचलला. केवळ मुद्दा उचललाच नाही तर हेही सांगितलं की महाराष्ट्राचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. आजही महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये काश्मिरी पंडित राहतात. आज तिथे लोक नोकरी करत आहेत, शाळांमध्ये आरक्षण दिलं आहे. त्यांना आदर आहे कारण ते आमचे बांधव आहेत. हे सर्व बाळासाहेब ठाकरेंचं देणं आहे. जर बाळासाहेब ठाकरेंनी केलं, तर मोदी, अमित शाह का करू शकत नाहीत? काश्मिरी पंडितांच्या मुद्य्यावर सरकार जर एवढं गंभीर नसेल तर, जी भाजपा काश्मिरी पंडितांच्या मुद्य्यांवरून राजकारण करत आली आहे. हा काही राजकारणाचा मुद्दा नाही. पंतप्रधानांनी प्राधान्याने हे काम करायला हवं. आता तर काँग्रेसचं सरकार नाही, दिल्लीत आणि इथेही तुमचं सरकार आहे मग तुम्ही का घाबरत आहात? सात वर्षांमध्ये काय केलं?” असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.