जम्मू काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे काश्मिरी पंडिताची दहशतवाद्याकडून करण्यात आलेल्या हत्येनंतर परिसरात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर काश्मिरी पंडितांकडून ठिकठिकाणी निर्देशने करत केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. काश्मिरी पंडितांवर सातत्याने हल्ले केले जात असून त्यांना सुरक्षा देण्यात जम्मू-काश्मीर आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप पंडितांनी केला आहे.

सरकारी कार्यालयात घसून केला होता गोळीबार

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट्ट नावाच्या एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना घडली. राहुल भट्ट हे तहसीलदार कार्यालयात कार्यरत असून गुरुवारी त्यांच्या ड्युटीवर होते. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून राहुल भट्ट यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर राहुल यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.

केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

या घटनेनंतर काश्मिरी पंडित आणि संपूर्ण जम्मू काश्मीरच्या जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काश्मिरी पंडितांनी काश्मीरमध्ये रस्त्यावर उतरत सरकारविरोधात निदर्शने केली. सुरक्षेची हमी न मिळाल्यास त्यांच्या कामावर जाणार नाही, असे पंडितांनी स्पष्टपणे सांगितले. काश्मिीरी पंडितांनी बारामुल्ला-श्रीनगर महामार्ग आणि जम्मू-श्रीनगर महामार्ग रोखून धरत केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा- जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; सरकारी कार्यालयात घुसून झाडली गोळी

राहुल यांनी केला होता बदलीचा अर्ज

राहुल भट्टच्या वडिलांनी सांगितले की, राहुल गेल्या अनेक महिन्यांपासून बदलीसाठी अर्ज करत होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्याच्या अर्जावर विचार केला नाही. “सरकारी कार्यालयात पंडित सुरक्षित नसेल, तर कुठे आहे? राहुलची पत्नी आणि मुलेही काश्मीरमध्ये आहेत. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राहुलला २०११ मध्ये नोकरी मिळाली, पण त्याला चदूराकडून बदली हवी होती.

बंतलाबमध्ये राहुल यांच्यावर अंत्यसंस्कार

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे आंदोलक काश्मिरी पंडितांनी स्पष्ट केले होते. मात्र, प्रशासनाने समजूत घातल्यानंतर राहुल भट्ट यांचा मृतदेह ताब्यात घेत राहुल यांच्या घरी नेण्यात आला. राहुल भट्ट यांच्यावर शुक्रवारी सकाळी बंतलाबमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे एडीजीपी मुकेश सिंग, विभागीय आयुक्त रमेश कुमार आणि उपायुक्त अवनी लवासा अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

Story img Loader