काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या निर्णयावर तेथील राज्य सरकारने अवघ्या काही तासांत घुमजाव केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा नवी दिल्लीमध्ये होते आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना त्यांच्या घरामध्येच नजरकैदेत ठेवले. गुरुवारी सकाळी या नेत्यांच्या घरांभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, अवघ्या काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात आला आणि घराभोवती तैनात करण्यात आलेले पोलीस माघारी बोलावण्यात आले.
यासंदर्भात हुर्रियत (जी)चे प्रवक्ते अयाझ अकबर म्हणाले, आम्ही गोंधळून गेलो आहोत. आमच्या नेत्यांच्या घराभोवती आणि कार्यालयाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आमच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, काही वेळातच हा पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला.
आम्हाला सुरुवातीला या सर्व नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, थोड्याच वेळानंतर या सर्वांना सोडून देण्याची सूचना मिळाली असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या या निर्णयावर टीका केली. फुटीरतावादी नेत्यांनी दिल्लीला जाऊ नये, यासाठीच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader