काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर निघालेल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला शनिवारी श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं. त्यानंतर जवळपास तीन तासांमध्ये सर्व विरोधी नेत्यांची विमानतळावरूनच दिल्लीला परतपाठवणी करण्यात आली. यादरम्यान विमानातील प्रवासादरम्यानच एका काश्मिरी महिलेने राहुल गांधींसमोर आपल्या समस्या मांडल्या. राहुल गांधींसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचताना या महिलेला रडू कोसळलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस प्रवक्त्या राधिका खेरे यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला असून त्यासोबत “कश्मीर का दर्द सुनिए..” अशी भावनिक पोस्ट केली आहे.
श्रीनगर से वापस आते वक्त फ्लाइट में एक महिला @RahulGandhi से अपनी मुश्किल बताते हुए। pic.twitter.com/f8mzgaskhx
— Arun Kumar Singh (@arunsingh4775) August 24, 2019
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला राहुल गांधींसमोर काश्मीरची परिस्थिती आणि समस्या कथन करताना दिसत आहे. आम्ही खूप त्रस्त आहोत असं ही महिला या व्हिडिओमध्ये वारंवार सांगताना दिसत आहे. “शिक्षण घेणाऱ्या छोट्या छोट्या मुलांचंही घरातून बाहेर पडणं कठीण झालंय…एकमेकांना शोधायला ते जातात तर त्यांनाही पकडलं जातं…एका भावाला हृदयाचा त्रास आहे, पण 10 दिवसांपासून त्यांनाही डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जाता येत नाहीये…आम्ही खूप त्रस्त आहोत”, अशा शब्दांमध्ये आपली कैफियत मांडताना या महिलेला रडू कोसळतं. यानंतर तेथे उपस्थित काही महिला पत्रकार आणि इतर प्रवासी या महिलेचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेरीस तिचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर राहुल देखील या महिलेचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
कश्मीर का दर्द सुनिए… pic.twitter.com/FRyg1Chifg
— Radhika Khera (@Radhika_Khera) August 24, 2019
केंद्र सरकारने पाच ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विरोधकांचं शिष्टमंडळ काश्मीरमधील परिस्शितीची पाहणी करण्यासाठी गेलं होतं. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे गुलामनबी आझाद, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, ‘एलजेडी’चे शरद यादव, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेमन यांच्यासह विरोधी पक्षांच्या १२ नेत्यांचे शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळावर आगमन झाले होते. पण विरोधकांच्या शिष्टमंडळाला विमानतळावरच रोखण्यात आले. यानंतर सर्व नेत्यांनी बडगाम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लिहून ‘राज्यपालांच्या जाहीर निमंत्रणावरून आम्ही काश्मिरात दाखल झालो आहोत. शांततापूर्ण व मानवतावादी दृष्टिकोनातूनच आम्ही काश्मिरी जनतेप्रती पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला रोखणे हे लोकशाहीविरोधी व बेकायदा आहे’ या घटनेचा निषेध केला. त्यानंतर सर्व विरोधी नेत्यांची विमानतळावरूनच दिल्लीला परतपाठवणी करण्यात आली.