संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या पठाणकोट येथील न्यायालयात ट्रान्सफर केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी हा खटला चंदीगड न्यायालयात हलवण्याची मागणी केली होती तसेच आरोपींनीही याचिका दाखल करुन हा खटला पोलिसांकडून सीबीआयकडे ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने आरोपींची मागणी फेटाळून लावली.

जम्मू- काश्मीरमधील कठुआ येथ आठ वर्षीय मुलीवर मंदिरामध्ये सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची भयानकता समोर आली आणि नंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटले. जम्मू-काश्मीर सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. कठुआ जवळच्या गावात राहणाऱ्या आठ वर्षांची पीडित मुलगी १० जानेवारीला तिच्या घराजवळून बेपत्ता झाल्यानंतर आठवडयाभरानंतर त्याच परिसरात मुलीचा मृतदेह सापडला होता.

निष्पक्ष सुनावणी होत नसल्याची पुसटशी जरी शक्यता वाटली तर खटला दुसऱ्या न्यायालयात ट्रान्सफर करु असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने आधीच दिला होता. राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेने कठुआ जिल्ह्यातील सत्र न्यायालयात सात आरोपी आणि अल्पवयीन आरोपीविरोधात स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रातून मुलीचे अपहरण केल्यानंतर हत्या करण्यापूर्वी तिच्यावर मंदिरात कसे पाशवी अत्याचार करण्यात आले ती धक्कादायक माहिती समोर आली.

दोन दिवसांपूर्वीच पीडितेच्या आईने आरोपींना फाशी द्या किंवा आम्हाला तर गोळ्या घाला अशी मागणी केली. जर न्याय होऊ शकत नसेल तर आम्हा चौघांना गोळ्या घाला. ते जर सुटले तर आम्हाला मारून टाकतील. चार गावातील लोक आमच्या जीवावर उठले आहेत. आम्ही केवळ चार लोक आहोत..सर्व काही गेले आहे. आमची मालमत्ताही गेल्याचे पीडितेच्या आईने सांगितले.

Story img Loader