विज्ञान परिषदेत पुन्हा पुराणातील वानग्यांची उधळण!
फगवाडा : टेस्टटय़ूब बेबी तंत्राच्या माध्यमातून कौरवांचा जन्म, रावणाचे पुष्पक विमान, महाभारत काळातील मिसाइल्स अशी पुराणातील वानगी पुन्हा एकदा ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’च्या व्यासपीठावर मांडली गेली आहेत. तीन वर्षांपूर्वीही विज्ञान काँग्रेसमध्येच प्राचीन काळातील विमानांचा उल्लेख वादग्रस्त ठरला होता. मात्र त्याच भूमिकेची री ओढत आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जी. नागेश्वर राव यांनी कौरव म्हणजे टेस्ट टय़ूब बेबी होते, यासारख्या विधानांची पेरणी या अधिवेशनात केली आहे.
तीन वर्षांपूर्वीची १०२ वी ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’ मुंबई येथे झली. त्यात सत्तारूढ पक्षाच्या एका नेत्याने प्राचीन काळातील विमानांचा केलेला उल्लेख वादाला तोंड फोडणारा ठरला होता. आता विज्ञान काँग्रेसच्या १०६व्या पर्वातही महाभारतातील कौरवांनी आधुनिक उपकरणांना तसेच विष्णूच्या दशावतारांनी डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला आव्हान दिले आहे. आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव यांनी ‘कौरवांचा जन्म हा टेस्ट टय़ूब बेबी तंत्रातून झाला. विष्णूचे दहा अवतार म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. विष्णूचे सुदर्शन चक्र हे ‘गाइडेड मिसाइल’ आहे. रावणाची २४ विमाने आणि विमानतळ होते.’ अशी विधाने केली.
ते म्हणाले की, ‘एक महिला तिच्या आयुष्यात शंभर मुलांना जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे गांधारीने स्टेम सेल थेरपी आणि टेस्टटय़ूब बेबी अशी तंत्रे वापरून मुलांना जन्म दिला. यावर विश्वास ठेवायला हवा. स्टेम सेलवरील संशोधन आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी झाले होते. रावणाकडे फक्त पुष्पक विमान नव्हते तर २४ वेगवेगळ्या प्रकारची विमाने होती. लंकेत अनेक विमानतळ होते.’
याचवेळी डॉ. कानन कृष्णन यांनीही पौराणिक संदर्भाची री ओढली. त्याचवेळी गेल्या विज्ञान काँग्रेसमध्ये केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ‘वेद हे आईनस्टाईनच्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ होते,’ अशा आशयाचे विधान केले होते ते योग्यच होते असे डॉ. कृष्णन म्हणाले. ‘लिगो’ प्रकल्प मोदी सरकारने मंजूर केल्यामुळे ‘ग्रॅव्हीटेशनल वेव’ ऐवजी ‘नरेंद्र मोदी वेव’ असे नामकरण करावे, असे विधानही त्यांनी केले.