हैदराबाद : तेलंगणाचे सरकार दोन मंत्र्यांवरच चालवले जाणार की काय अशी चर्चा असतानाच अखेर मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला असून त्यात दहा मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात एन. निरंजन रेड्डी, कोपुल्ला ईश्वर, इराबेली दिवाकर राव, व्ही. श्रीनिवास गौड, पेमुला प्रशांत रेड्डी, चे. मल्ला रेड्डी हे नवीन चेहरे आहेत. इंद्रकरण रेड्डी, तलासनी श्रीनिवास यादव, जी.जगदीश रेड्डी व एटला राजेंदर या जुन्या मंत्र्यांचे पुनरागमन झाले आहे.
आंध्र व तेलंगणचे राज्यपाल इ. एस. एल. नरसिंहन यांनी मंत्र्यांना राजभवनातील कार्यक्रमात अधिकारपदाची व गोपनीयतेची शपथ दिली त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता १२ झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे पुतणे व वरिष्ठ तेलंगण राष्ट्रीय समिती नेते टी. हरीश राव हे आधी पाटबंधारेमंत्री होते पण त्यांचे नाव मंत्र्यांच्या यादीत नव्हते. तेलंगण राष्ट्रीय समितीचे प्रमुख के. सी. राव यांचे पुत्र के. टी. रामाराव यांनाही मंत्री करण्यात आले नाही.
राव यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही. रामाराव यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले होते. १३ डिसेंबरला महंमद महमूद अली यांच्यासह दोघांचा शपथ विधी झाला होता.