kedarnath yatra 2023 registration : केदारनाथ धाम यात्रा २०२३ नुकतीच सुरु झाली आहे. केदारनाथ मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तराखंड राज्यात आहे. अशा स्थितीत दरवर्षी भारतातील विविध राज्यातून आणि परदेशातून लाखो भाविक केदारनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर खूप उंचीवर असल्याने हवामानाचा विचार करता मंदिराचे दरवाजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच उघडले जातात. यंदा २२ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी चारधाम यात्रेला सुरुवात झाली. यावेळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे सुरु करण्यात आले, पण केदारनाथ यात्रा सुरु होताच गढवाल हिमालय भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी झाल्याने ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये ३० एप्रिलपर्यंत यात्रेकरुंची नोंदणी थांबवण्यात आली आहे. यामुळे केदारनाथ मंदिर आता २५ एप्रिल रोजी उघडणार आहे. यामुळे तु्म्ही देखील केदारनाथ धाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर ३० एप्रिलपर्यंत जरा थांबा.
याबाबत पीटीआयशी बोलताना गढवाल विभागाचे अतिरिक्त आयुक्त (प्रशासन) आणि डॉ. चारधाम यात्रा प्रशासकीय संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र सिंह कविरियाल यांनी सांगितले की, खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टी लक्षात घेता ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी 30 एप्रिलपर्यंत थांबवण्यात आली आहे.
यंदा २२ एप्रिलला म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात झाली. २२ एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री ही पवित्र तीर्थे यात्रेकरूंसाठी खुली करण्यात आली आहेत. तर बद्रीनाथ मंदिर २७ एप्रिलपासून भाविकांसाठी खुले होणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत भारत आणि विदेशातील १६ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेता यात्रेकरुंना पुरेसे उबदार कपडे सोबत ठेवण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. या खराब हवामानामुळे यात्रेकरूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, यामुळे यात्रेकरूंसाठी सर्व मार्गात पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
याबाबत आरोग्य सचिव डॉ राजेश कुमार म्हणाले की, प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि एसओपी जारी करण्यात आले आहेत. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या शरीराला प्रवासादरम्यान पर्वतीय हवामानाशी जुळवून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना प्रवासात अडचण वाटत असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मगच प्रवास करा असा सल्लाही दिला आहे.
चार धाम यात्रा ही देशातील सर्वात शुभ तीर्थक्षेत्रांपैकी एक मानली जाते. यात गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र तीर्थांचा समावेश आहे.