भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडल्यानंतर राजकारणात उतरणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची आज जंतरमंतर येथे दिवसभर चाललेल्या मेळाव्याद्वारे औपचारिक सुरुवात झाली. हा नवा पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेची परिणती असल्याचे सांगून आता प्रस्थापित नेत्यांशी सर्वसामान्य माणसाची थेट लढत होईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत केली.
दीड वर्षांपूर्वी याच जंतरमंतरवर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली लोकपाल विधेयकासाठी आंदोलन छेडण्यात आले होते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाचे संविधान स्वीकारण्यात आले होते. आज त्याच मुहूर्तावर जंतरमंतर येथे ‘भारतमाता की जय’ आणि ‘इन्कलाबजिंदाबाद’च्या घोषणांच्या निनादात केजरीवाल यांच्या पक्षाची सुरुवात झाली. केजरीवाल यांची या पक्षाचे राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज गुप्ता राष्ट्रीय सचिव असतील तर कृष्ण कांत यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केजरीवाल यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २३ सदस्यांची नावे जाहीर केली. त्यात स्वत: सिसोदिया, प्रशांत भूषण, दिनेश वाघेला, संजय सिंह, गोपाळ राय आणि कुमार विश्वास यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
जंतरमंतरवर पोहोचण्यापूर्वी केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजघाटवर महात्मा गांधी आणि सिव्हिल लाइन्स येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. चार वर्षांपूर्वी मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला परतवून लावणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या कमांडोंना केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आदरांजली वाहिली. याप्रसंगी केजरीवाल यांनी ‘आम आदमी पक्षा’च्या संविधानाचेही प्रकाशन केले.
मात्र आम आदमी पक्षाला अपेक्षित उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रीय पक्षाची स्थापना करणाऱ्या केजरीवाल यांनाही असंख्य आरामगाडय़ांमधून समर्थकांना आणणे भाग पडले. शेजारच्या गाझियाबाद, गुरगाव, फरिदाबाद, नोइडासह हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून अनेक बसगाडय़ा भरून केजरीवाल यांच्या पक्षाच्या समर्थकांना जंतरमंतरवर पोहोचविण्यात आले होते. प्रसिद्धीमाध्यमांनी नेहमीपेक्षा कमी प्रतिसाद दिल्यामुळेही केजरीवाल यांचे समर्थक हिरमुसले होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा