दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात असामान्य गुणवत्ता आहे, बहुसंख्य वेळा त्यांचे निर्णय अचूक असतात, तरीही त्यांच्या हातून काही वेळा चूक होते, असे मत आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. तर पक्षात अधिक लोकशाही प्रक्रिया हवी असल्याचे मत मांडले असताना त्याचा केजरीवाल यांच्या विरोधातील बंड असल्याचा विपर्यास करण्यात आला आणि आपल्यावर खोटय़ानाटे आरोप करण्यात आले त्यामुळे व्यथित झाल्याचे योगेंद्र यादव यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
दिल्लीत लक्षणीय यश मिळविणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) सध्या अंतर्गत कलहाने घेरले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकाविणारे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. असे असले तरी केजरीवाल यांच्यात असामान्य गुणवत्ता असल्याचे भूषण यांचे म्हणणे आहे. मात्र केजरीवाल यांच्यात काही दोषही असून त्यांनी ते ओळखले पाहिजेत, असेही भूषण यांना वाटते. केजरीवाल यांना एकत्रित निर्णय घेण्यास आवडते आणि हाच त्यांचा एक दोष असल्याचे आपण त्यांना सांगितले आहे. त्यांचे बहुसंख्य निर्णय योग्य असले तरी काही वेळा त्यांच्या हातून चूक होते, असे भूषण यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
योगेंद्र यादव यांनाही आपमध्ये अधिक लोकशाही प्रक्रिया हवी आहे, मात्र त्यांच्या भूमिकेचा निराळा अर्थ लावण्यात आला आहे. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी करण्यात आली असली तरी त्यावर भाष्य करण्याची आपली इच्छा नाही, सत्य समोर येईलच, असे यादव यांनी म्हटले आहे. आपल्यापेक्षा अधिक गुणवत्ता असलेले लोक पक्षात आहेत तरीही त्यांच्याकडे कोणतेही पद नाही. खोटे आरोप झाल्याने व्यथित झालो असून यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याचे ठरविले आहे.
पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमधून आपली हकालपट्टी करण्यात आल्याने कार्यकर्ते, हितचिंतक यांना वेदना झाल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. पक्ष आपल्या मूळ तत्त्वांपासून फारकत घेत चालला असल्याचे आपले म्हणणे होते आणि तेच आपण आणि यादव यांनी पत्रात मांडले होते. पक्ष आपल्या तत्त्वांपासून दूर जाऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही काही मार्गदर्शक तत्त्वे पत्रात नमूद केली होती. मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे पक्ष एकत्रित नसल्याची कार्यकर्त्यांची धारणा झाली आहे, असेही भूषण यांनी म्हटले आहे.
केजरीवालांवर उपचार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बंगळुरू शहरातील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेतले. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाले असून त्यांना जुनाट खोकल्याचा त्रासही जाणवत आहे. त्यावर निसर्गोपचार करण्यासाठी केजरीवाल आपल्या माता-पित्यांसह जिंदाल संस्थेत आले आहेत.
केजरीवाल कधीतरी चुकतात!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात असामान्य गुणवत्ता आहे, बहुसंख्य वेळा त्यांचे निर्णय अचूक असतात, तरीही त्यांच्या हातून काही वेळा चूक होते,
First published on: 07-03-2015 at 12:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal also make a mistake says prashant bhushan