दिल्ली विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजपानं जोर लावला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांसह केंद्रीय मंत्री आणि अनेक नेते दिल्लीत मुक्काम ठोकला आहे. महाराष्ट्रातूनही काही नेते गेले असून माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सुद्धा उमेदवारांचा प्रचार करत आहेत. तावडे यांचा प्रचार करतानाच फोटो ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. “महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा बंद करणारे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे दिल्लीत भाजपाचा प्रचार करणार आहेत. त्यांना दिल्लीतील शाळा दाखवा,”असं दिल्लीकरांना आवाहन करत तावडेंना केजरीवाल यांनी टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली विधानसभेचं मतदान तोंडावर आलं असून, भाजपा, आप आणि काँग्रेसनं स्वतःला प्रचारात झोकून दिलं आहे. त्यामुळे राजकीय कुरघोड्यांबरोबरच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही जोरात सुरू आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं प्रतिष्ठा पणाला लावली असून, अनेक नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह इतर राज्यातील नेतेही दिल्लीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे हे सुद्धा दिल्लीत प्रचारात दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र विनोद तावडे यांचा समाचार घेतला आहे.

दिल्लीत भाजपा उमेदवाराचा प्रचार करतानाच विनोद तावडे यांचे दोन फोटो केजरीवाल ट्विट केले आहेत. त्याचबरोबर “विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आहेत. ज्यांनी राज्यातील १३०० सरकारी शाळा बंद केल्या. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. दिल्लीकरांनों, ‘आप’ने खूप मेहनत घेऊन सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दाखवा. ते आपले अतिथी आहेत,” अशी टीका केली आहे.

विनोद तावडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते. मात्र, २०१९मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आलं नव्हतं. यावरून त्यांना पक्षाकडून डावलण्यात आल्याचं बोललं जात होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal appeal to people of delhi show our school to vinod tawde bmh