आपल्या मुलाखतीचा ठराविक भागच दाखवा, असं चक्क आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल टिव्ही मुलाखतकाराला सांगत असल्याचा एक व्हिडिओ सध्या युट्यूबर लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिल्याचे दिसते.
जवळपास ८० सेकंद लांबीच्या या व्हिडिओमध्ये मुलाखत संपल्यावर केजरीवाल आणि मुलाखतकाराचे संभाषण यामध्ये पाहायला मिळते. केजरीवाल मुलाखतकाराला मुलाखतीमधील काही विशिष्ट भागांवर विशेष भर देण्यास सांगत आहेत. ‘..हा भाग अधिक चालवा’, असे केजरीवाल व्हिडिओमध्ये सांगताहेत. त्यावर टिव्ही मुलाखतकारही संमती दर्शवत असल्याचे दिसत असून, भगतसिंग यांच्यावरील भाष्य चांगले असून, त्यावर भरपूर प्रतिक्रिया येतील, असा संवाद यामध्ये पाहावयास मिळतो.
वरवर पाहता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरची ही मुलाखत दिसते आहे. विशेष म्हणजे, ज्यादिवशी केजरीवालांनी प्रसारमाध्यमे ही पक्षपाती असल्याचा आरोप केला होता, त्याच दिवशी हा व्हिडिओ लोकांना पाहण्यासाठी ऑनलाईन टाकण्यात आलाय.