दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ठार मारण्याची धमकी मिळाली असल्याचा आरोप ‘आप’ पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा डाव भाजपाने आखला असल्याचा आरोप ‘आप’चे नेते खासदार संजय सिंह यांनी केला आहे. आम आदमी पक्षाच्या एक्स अकाऊंटवरील पोस्टसह काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. “मेट्रो स्थानकात अनेक ठिकाणी खुलेआम मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. राजीव चौक, पटेल नगर या मेट्रो स्थानकावर भाजपाच्या आदेशावरून या धमक्या देण्यात आल्या आहेत”, असा दावा ‘आप’ने केला.
“जर अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार असेल”, असाही आरोप ‘आप’ने केला आहे.
खासदार संजय सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांना घालविण्यासाठी भाजपा पक्ष हातघाईवर आला आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्यांना लक्ष्य करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. केजरीवाल यांच्या जिवाला धोका निर्माण होईल, असे कृत्य भाजपाकडून केले जाण्याची शक्यता आहे. याआधीही भाजपाने केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे, ही पहिली वेळ नाही. सध्या खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत, दिल्लीच्या अनेक मेट्रो स्थानकावर धमक्या लिहिल्या गेल्या आहेत. पंतप्रधान कार्यालय आणि स्वतः पंतप्रधानांच्या इशाऱ्यावर या धमक्या दिल्या जात आहेत, असा माझा थेट आरोप आहे.”
दरम्यान आप नेत्या आतिशी म्हणाल्या की, राजीव चौक, पटेल चौक आणि इतर मेट्रो स्थानके हे पूर्णतः सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहेत. पोलीस आणि सीआयएसएफचे सुरक्षा कर्मचारी २४ तास इथे तैनात केलेले असतात. तरीही एका व्यक्तीने स्थानकावर खुलेआम धमकीचा संदेश लिहून पळ काढला आणि धमकीचा संदेश लिहिणाऱ्याला शोधण्याचाही प्रयत्न केला जात नाही. ज्या व्यक्तीने धमकी दिली, त्याने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर फोटोही पोस्ट केले आहेत. पोलीस आणि सायबर सेल कुठे आहे? स्वाती मालिवाल यांच्या खोट्या आरोपांची दखल घेताना पोलिसांनी चपळता दाखवली होती, मात्र हेच पोलीस धमकी देणाऱ्याला पकडताना दाखवत नाहीत.