दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लीम धर्मीयांकडे धर्माच्या आधारे मते मागितल्याने निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. केजरीवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांना ही नोटीस पाठविल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. दरम्यान पक्षाने निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला.
केजरीवाल यांना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यांनी या मुदतीत नोटिशीला उत्तर द्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
भाजपचे नेते हरीश खुराना यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली. मुस्लीम धर्मीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी केजरीवाल यांनी दिल्लीत प्रसिद्धीपत्रके वाटली. ‘‘भाजप हा जातीय पक्ष असून, तो मुस्लीम धर्मीयांचा विकास कधीही करू शकत नाही. आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीत आल्यास मुस्लीम धर्मीयांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होणार नाही,’’ असे आश्वासन दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आम आदमी पक्षाचा जाहीरनामा
* विजेची बिले निम्म्यावर आणणार
* महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल स्थापन करणार.
* राज्यात जनलोकपाल विधेयक आणणार
* १९८४च्या शीखविरोधी दंगलीतील बळींच्या कुटुंबीयांना न्याय देणार
* बनावट चकमकी रोखणार
* मुस्लीम तरुणांविरोधात चुकीचे गुन्हे नोंदवले जाणार नाहीत याकडे लक्ष देणार