भारतीय जनता पक्षाला जमीनदोस्त करून दिल्लीत ऐतिहासिक बहुमत मिळवणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात सुरू असलेले तीव्र मतभेद थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले आहेत.
अधिकारांवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यासाठी नजीब जंग यांनी थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हा तिढा सोडविण्याची विनंती केली. अर्थात राष्ट्रपती भवनातून जंग व मुखर्जी यांच्या भेटीविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. जंग यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत केजरीवाल यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विशेष म्हणजे मुख्य सचिव नियुक्तीवरून नजीब जंग व अरविंद केजरीवाल यांच्यात सुरू असलेल्या भांडणामुळे राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे.
नजीब जंग यांनी स्वतच्या अधिकारात शकुंतला गैमलिन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. त्यावर गैमलिन यांचे वीज कंपन्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप करीत केजरीवाल यांनी जंग यांच्यावर जाहीर टीका केली होती. नजीब जंग व राजनाथ सिंह यांच्यात झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला न जुमानण्याची रणनीती आखण्यात आली आहे. नजीब जंग घेत असलेले सर्व निर्णय घटनात्मक चौकटीत आहेत. राज्य मंत्रिमंडळाशी चर्चा न करता निर्णय घेण्याचे अधिकार नायब राज्यपालांना असल्याचे सांगत गृह राज्यमंत्री किरिन रिजिजू यांनी राज्य सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला होता. राजनाथ सिंह यांनी नियुक्त केलेले प्रधान सचिव आनंदो मुजुमदार यांच्या कार्यालयास राज्य सरकारने कुलूप लावून त्यांच्या जागी राजेंद्र कुमार यांची नियुक्ती केली.
तेवढय़ावर न थांबता केजरीवाल यांनी परिपत्रक काढून नायब राज्यपालांचे आदेश न मानण्याची सूचना राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना केली. अवघ्या दोन तासांमध्ये नजीब जंग यांनी राजेंद्र कुमार यांची नियुक्ती रद्द केली होती. केजरीवाल व नजीब जंग यांच्या मतभेदांमुळे गेल्या तीन दिवसांमध्ये तीन अधिकाऱ्यांची चार वेळा बदली करण्यात आली आहे.
केजरीवाल-जंग वाद राष्ट्रपती भवनात
भारतीय जनता पक्षाला जमीनदोस्त करून दिल्लीत ऐतिहासिक बहुमत मिळवणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात सुरू असलेले तीव्र मतभेद थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-05-2015 at 12:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal jung war reaches rashtrapati bhavan