सीएनजीच्या दरात केलेल्या वाढीबाबत ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर तपासणी करून सीएनजी दरवाढीबाबतचा निर्णय रद्द करता येईल का, याबाबत गंभीरपणे विचार करणार असल्याचे शुक्रवारी त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत नवीन सरकार सत्तास्थापन करणार असताना सीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून हा दरवाढीचा निर्णय संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बुधवारी मी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सीएनजी दरवाढीबाबतच्या फायलीची पाहणी करीन आणि सीएनजीची ही दरवाढ मागे घेता येईल, याबाबत निर्णय घेईन, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. सीएनजीच्या दरात गुरुवारपासून प्रति किलोमागे ४.५० रुपयांची वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे.
दरवाढीमागे ‘आप’चा हात -हर्षवर्धन
सीएनजी दरात वाढ होण्यामागे आम आदमी पार्टीचा हात असून ही दरवाढ मागे न घेतल्यास पक्षाला निदर्शने करावी लागतील, असा इशारा भाजपने दिला आहे. नव्याने निवडून आलेल्या सरकारच्या अनुमतीविना संबंधित अधिकारी हा निर्णय घेऊ शकत नाहीत. शपथविधीपूर्वीच दिलेली ही भेट मागे घेतली नाही तर मोठी निदर्शने करण्याचे भाजपने ठरविले आहे, असे भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते हर्षवर्धन यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा