गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दादरी येथील एका व्यक्तीची गावकऱ्यांनी हत्या केल्याच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या राजकारणात शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उडी घेतली. केजरीवाल हे शनिवारी दादरीतील बिसरा गावात महमंद अखलख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात होते. मात्र, गावातील आंदोलन आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांकडून केजरीवालांच्या लवाजम्याला याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत आपचे संजय सिंग आणि आशुतोष हेदेखील होते. मात्र, या सगळ्यांना बिसरा गावाजवळ असणाऱ्या एका फार्महाऊसवर रवाना करण्यात आले.
त्यानंतर केजरीवाल यांनी ट्विटरवरून या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. केंद्रीय मंत्री महेश शर्मा आणि एमआयएमचे असुद्दीन ओवेसी यांना गावात प्रवेश दिला जात असताना मला गावात जाण्यापासून का रोखले गेले, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. मी येथे राजकारण करण्यासाठी आल्याचा आरोप केला जात आहे. हो मी राजकारण करणार आहे. पण, ते एकता आणि प्रेमाचे आहे. इतरजण द्वेषाचे राजकारण करतात, असे केजरीवाल यांनी म्हटले. याशिवाय, हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र राहणे गरजेचे असून त्यांनी कोणाचीही व्होटबँक होऊ नये, असेदेखील त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या बिसरा गावात तणावाचे वातावरण असून याठिकाणी सशस्त्र सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत.

Story img Loader