झाकीर हुसैन ट्रस्टमध्ये झालेल्या ७१ लाखांच्या घोटाळ्यात विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शीद यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी होईपर्यंत संसद मार्गावर धरणे देण्याचा निर्धार चार दिवसांत गुंडाळून अरविंद केजरीवाल यांनी आपले आंदोलन थांबविले आहे. आता खुर्शीद यांचा लोकसभा मतदारसंघ फारुखाबाद येथे १ नोव्हेंबरपासून आंदोलन छेडण्याची नवी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, या वादाच्या पाश्र्वभूमीवर खुर्शीद मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.
खुर्शीद अध्यक्ष असलेल्या झाकीर हुसैन ट्रस्टमध्ये अपंगांना कर्णयंत्र व यांत्रिक उपकरणे देण्याच्या बाबतीत ७१ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप इंडिया टुडे समूहाने केला आहे. खुर्शीद यांनी रविवारी ब्रिटनहून परतल्यानंतर या आरोपांचे पुराव्यांनिशी खंडन केले. इंडिया टुडे समूहाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात खुर्शीद २०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहेत. खुर्शीद यांनी इंडिया टुडे समूहाविरुद्ध लंडनमध्येही ५० लाख पौंडांचा दावा ठोकण्याचे ठरविले आहे. एवढेच नव्हे तर दिल्लीच्या न्यायालयातही ७१ लाख रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात येत आहे. भ्रष्टाचार प्रकरणी यापूर्वी शशी थरूर आणि अशोक चव्हाण यांचे आरोप सिद्ध होण्यापूर्वीच राजीनामे घेणाऱ्या काँग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. हवेत होणाऱ्या आरोपांची दखल घेऊन आपले मोहरे गमावण्यात काहीच हशील नाही, असा निष्कर्ष काढून सलमान खुर्शीद यांचे समर्थन करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. खुर्शीद यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसताना त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, अशा निर्णयाप्रत काँग्रेसश्रेष्ठी पोहोचले आहेत. खुर्शीद यांचा राजीनामा घेतल्यावर रॉबर्ट वढेरा यांचे प्रकरण पुन्हा डोके वर काढेल, अशीही भीती काँग्रेसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा