नवी दिल्ली :राजधानी दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या वटहुकूमाच्या रुपाने दिल्लीवर पहिला हल्ला करण्यात आला असून त्यानंतर इतर राज्यांवर अशाच वटहुकूमांच्या स्वरुपात हल्ले केले जातील, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केले.
दिल्लीतील रामलीला मैदानावर आपने आयोजित केलेल्या महामेळाव्यात भाषण करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. केंद्राने काढलेला वटहुकूम हा दिल्लीतील जनतेचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली.
दिल्लीतील प्रशासकीय बदल्या हा दिल्ली सरकारचा अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीतील ‘गट-अ’च्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांसाठी एक प्राधिकरण स्थापण्याचा वटहुकूम काढला. न्यायालयाच्या निर्णयाला डावलून आणलेला हा वटहुकूम म्हणजे फसवणूक असल्याचा आरोप ‘आप’ सरकारने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ११ मेच्या निकालापूर्वी, दिल्ली सरकारमधील सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या ही बाब नायब राज्यपालांच्या अधिन होती.
दिल्लीतील असह्य उष्म्यातही या महामेळाव्यास हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह ‘आप’चे वरिष्ठ नेते उपस्थित होते. ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य कपिल सिबलही हेही उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले, की भाजपने मला शिवीगाळ केली तरी मला काहीही फरक पडत नाही. मात्र, मी दिल्लीवासीयांचा अपमान कदापिही सहन करणार नाही. केंद्रातील भाजपप्रणित सरकारचा राज्यघटनेवर विश्वास नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण स्वीकारत नसल्याचे म्हणतात तेव्हा त्याला ‘हिटलरशाही’ म्हणतात. मोदींचा हा काळा वटहुकूम लोकशाहीविरोधी आहे.
संसदेत या वटहुकुमाचे विधेयक नामंजूर व्हावे यासाठी मी भाजपविरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. कृपया तुम्ही एकटे आहात असे समजू नका. तुम्हाला भारतातील १४० कोटी जनतेचा पािठबा आहे, असा दिलासा समर्थकांना देताना केजरीवाल म्हणाले, दिल्ली या हल्ल्याला सामोरे जाणारे पहिले शहर आहे. जनतेचा हक्क हिरावून घेणाऱ्या या अध्यादेशाला विरोध केला नाही तर राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठीही असेच वटहुकूम आणले जातील.
‘चांगल्या कामां’त भाजपचे अडथळे
पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून २१ वर्षे सत्तेत आहेत. केजरीवाल आठ वर्षांपासून सत्तेत आहेत. लोकांसाठी जास्त काम कोणी केले? पूर्ण सत्ता असूनही मी केलेले काम ते करू शकले नाहीत. अनेक अडथळय़ांवर मात करत मी हे काम उभे केले. केंद्रातील भाजप सरकार दिल्ली सरकार करत असलेली ‘चांगली कामे’ रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
‘आमच्याकडे १०० सिसोदिया आणि जैन!’
‘आप’चे नेते तसेच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अटकेबाबत केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील काम ठप्प करण्यासाठी या दोन्ही नेत्यांना अटक करण्यात आली, पण आमच्याकडे १०० सिसोदिया, १०० जैन आहेत. आम्ही सतत चांगले काम करत राहू.