संशोधकांनी परस्पर टोकाचे ऋतू असलेला अधिक घन व जास्त वस्तुमानाचा ग्रह शोधून काढला आहे. सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी ऑफ हायडेलबर्ग युनिव्हर्सिटी या संस्थेचे मॉरिसिओ ओरिटिझ व मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी या हायडेलबर्ग येथील संस्थेचे सिमोना सिसेरी यांनी सांगितले की, हा नवीन ग्रह गुरूपेक्षा वस्तुमानाने सहा पट जास्त आहे व त्याचा आकार मात्र तेवढाच आहे.
या ग्रहाच्या कक्षांचा आकार मात्र वेगळा असून या ग्रहाचे नाव केप्लर ४३२ बी असे असून तो एका मोठय़ा ताऱ्याभोवती फिरत आहे. २० कोटी वर्षांनंतर हा लाल महातारा त्या ग्रहाला गिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सापडलेले अनेक ग्रह हे त्यांच्या मोठय़ा ताऱ्यांभोवती फिरत आहेत व केप्लर ४३२ बी या ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे तो इतर ग्रहांपेक्षा वेगळा आहे, असे कोनिंगशूल वेधशाळेचे डॉ. डेव्हिड गँडोल्फी यांनी सांगितले. ते म्हणाले की, केप्लर ४३२ बी ज्या ताऱ्याभोवती फिरत आहे त्यातील अणुइंधन संपत आले आहे व तो प्रसरण पावत आहे. त्याची त्रिज्या सूर्याच्या चार पट असून ती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. हा तारा लालसर असून त्याला रेड जायंट असे म्हटले आहे. विशिष्ट कक्षेमुळे केप्लर ४३२ बी हा ग्रह मातृताऱ्याच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तेथे तापमानातील फरक प्रचंड आहे. तेथील वर्ष पृथ्वीच्या ५२ दिवसांइतके असून थंडीत तेथील तापमान ५०० अंश सेल्सियस असते तर उन्हाळ्यात ते १००० अंश सेल्सियस असते, असे कोनिंगशूल वेधशाळेचे डॉ. साबिन रेफर्ट यांनी म्हटले आहे. केप्लर ४३२ बी हा नासाच्या केप्लर सॅटेलाईट मिशनने अधिक्रमण ग्रह ठरवला होता, त्यात तो मातृताऱ्या समोरून जाताना दिसतो व त्यामुळे ताऱ्याचा प्रकाश कमी होतो. दोन्ही संशोधक गटांनी अंदासुसिया, स्पेन येथील कलार अल्टो वेधशाळेतील २.२ मीटरच्या दुर्बीणीने त्याचे निरीक्षण केले आहे. जर्नल अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
केप्लर ४३२ बी ग्रह
वर्ष- पृथ्वीच्या ५२ दिवसांइतके
थंडीत तापमान- ५०० अंश सेल्सियस
उन्हाळ्यात तापमान- १००० अंश सेल्सियस
वस्तुमान- गुरूपेक्षा सहापट जास्त

Story img Loader