देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तर करोना रुग्ण अजूनही आढळत आहेत. तर काही राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. केरळमध्ये करोनाची स्थिती गंभीर असल्याचं दिसून येत आहे. मागच्या तीन दिवसात केरळमध्ये करोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. देशाची करोनाची आकडेवारी पाहता केरळमधील करोना रुग्णसंख्या त्यात ५० टक्क्यांवर आहे. २६ जुलैला ११,५८६ रुग्ण होते. तर २८ जुलैला ही संख्या २२,०५६ इतकी झाली आहे.

करोनाचे वाढते रुग्ण पाहता केरळमध्ये ३१ जुलै आणि १ ऑगस्टला संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. केरळमध्ये मलप्पुरम, त्रिशूर, कोझिकोड, एर्नाकुलम, पलक्कड, कोल्लम, अलाप्पुझा, कन्नूर, तिरुवनंतपुरम आणि कोट्टायममध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये करोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्य सरकारसोबत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे.

केरळमध्ये बुधवारी २२,०५६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ३३ लाख २७ हजार ३०१ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १६ हजार ४५७ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ३१ लाख ६० हजार ८०४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १ लाख ४९ हजार ५३४ जणांवर उपचार सुरु आहेत.

Story img Loader