केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षांपूर्वी एक महिला बेपत्ता झाली होती. या बेपत्ता झालेल्या महिलेची तिच्या पतीने आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केल्याची घटना आता समोर आली आहे. या महिलेचा मृतदेह पुरल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता पोलिसांना काही अवशेष आढळून आले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, ३० वर्षीय महिलेचा पती आणि त्याच्या तीन नातेवाईकांनी या महिलेचा खून केला आणि तिचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराच्या चेंबरमध्ये फेकून दिला. या मृतदेहाचे काही अवशेष पोलिसांना आढळून आले आहेत. या घटनेचं रहस्य आता एका निनावी पत्रामुळे उलगडलं आहे.
अलप्पुझा परिसरातील एका गावात ही घटना घडली. या गावातील लोकांना वाटलं होतं की, ही महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली आहे. मात्र, बुधवारी पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला. हा खुलासा अलाप्पुझा येथील रहिवाशांना आश्चर्यचकित करणारा ठरला. कारण ३० वर्षीय महिलेचा तिचा पती अनिल कुमारने खून करून तिचा मृतदेह चेंबरमध्ये टाकला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी बुधवारी (३ जुलै) तिघांना अटक केली आहे. यामध्ये जीनू गोपालन, आर सोमराजन आणि प्रमोद यांना अटक करण्यात आली. तसेच या घटनेतील एक आरोपी इस्रायलमध्ये कार्यरत असून त्याला परत आणण्यासाठी पोलिसांकडून पावले उचलण्यात आली आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
हेही वाचा : बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले; दुर्घटनांच्या सखोल चौकशीची मागणी
दरम्यान, या घटनेबाबत अलप्पुझाच्या पोलीस अधीक्षक चैत्रा तेरेसा जॉन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, २००८-०९ मध्ये कला नावाची महिला बेपत्ता झाली होती. मात्र, आता तिची हत्या झाल्याची पुष्टी आम्ही केली आहे. वैयक्तिक वादातून ही हत्या झाली होती. तिचे अन्य एका व्यक्तीशी संबंध असल्याचा संशय होता. आम्ही सेप्टिक टँकमधून पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, या घटनेला तब्बल १५ वर्षे उलटून गेले आहेत. त्यामुळे या घटनेचा तपास हा पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे, असं पोलीस अधीक्षक चैत्रा तेरेसा जॉन यांनी सांगितलं.
ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार कोणीही दाखल केली नव्हती. मात्र, अलप्पुझाच्या पोलिसांनी एका निनावी पत्राचा शोध घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यामध्ये या हत्येचे संकेत पोलिसांना आढळून आले. या प्रकरणात आता अनिल कुमार नामक व्यक्ती आणि तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे. प्राथमिक चौकशीनुसार, अनिल कुमार आणि या महिलेने वेगवेगळ्या जातीतून लग्न केल्यामुळे कुटुंब नाराज होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर अनिल हा कामासाठी परदेशात गेला. मात्र, त्याची पत्नी तिच्या सासरच्यांसोबत राहत होती. त्यानंतर काही महिन्यांनी ती बेपत्ता झाली. दरम्यान कुमारने दुसरे लग्न केले असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd