Kerala Bank Heist Crime News : केरळमध्ये एका बँकेत भर दुपारी अवघ्या अडीच मिनिटांत एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे महामार्गावर असलेल्या एका बँकेत एक व्यक्ती आला आणि त्याने चाकूचा धाक दाखवून बँकेतील सर्व कर्मचार्यांना वॉशरूममध्ये बंद केलं आणि तो चक्क स्कूटरवरून १५ लाख रूपयांची रोकड घेऊन फरार झाला. हे सगळं घडलं ते फक्त अडीच मिनिटांच्या वेळेत.
दरोडेखोराटा शोध घेण्यासाठी शुक्रवारी पोलिसांनी मोहिम उघडली असून अद्याप हा आरोपी सापडलेला नाही. पोलिसांना संशय आहे की दरोडा टाकणारा व्यक्तीला बँकेच्या परिसराची माहिती होती.
नेमकं काय झालं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १.३० वाजता त्रिस्सूर जिल्ह्यातील पोट्टा येथील फेडरल बँकेच्या शाखेबाहेर बॅग घातलेला एक माणूस बँकेच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात दिसून आला आहे. यावेळी बँकेतील बरेचसे कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी बाहेर गेलेले होते.
व्हिडीओ फुटेजमध्ये तो माणूस बँकेत कामाला असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना चाकूने धमकावत आणि त्यांना वॉशरूममध्ये बंद करताना दिसतो. त्यानंतर तो खुर्चीचा वापर करून कॅश काउंटरचे काचेचे चेंबरला फोडतो आणि पैसे घेऊन पळून जातो. पोलिसांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेला फक्त अडीच मिनिटे इतकाच वेळ लागली.
४७ होते फक्त १५ लाख घेऊन पळाला
त्रिस्सूर ग्रामीण एसपी बी कृष्ण कुमार यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती देताना सांगितेल की, “आरोपी हिंदीमध्ये बोलत होता. कॅश काउंटरवर ४७ लाख रूपयांचे बंडल होत्या. चोराने नोटांचे फक्त तीन बंडल जे की १५ लाख रुपये होते ते पळवले. तो बँकेच्या शाखेत अशा प्रकारे वागला जसे की त्याला या ऑफिसची चांगली माहिती आहे.”