Love Jihad Kerala: केरळमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे घडत आहेत, असा दावा करणारा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत का? अशी चर्चा घडली होती. आता केरळमधील भाजपाचे नेते आणि पुंजर विधानसभेचे माजी आमदार पीसी जॉर्ज यांनी पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा मांडला आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलत असताना पीसी जॉर्ज म्हणाले की, लव्ह जिहादमुळे एकट्या मीनाचिल तालुक्यातून ४०० मुली हरवल्या आहेत. त्यापैकी केवळ ४१ मुलींना परत आणण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
पीसी जॉर्ज यांनी पुढे म्हटले की, केरळमधील सद्यपरिस्थिती पाहता ख्रिश्चन पालकांनी त्यांच्या त्यांच्या मुलींचे वय २४ वर्ष होण्याआधीच लग्न लावून टाकावे. तसेच अलीकडे एराट्टूपेट्टा येथे मोठ्या प्रमाणात स्फोटके ताब्यात घेण्यात आली होती. यावर बोलताना ते म्हणाले, संपूर्ण राज्य उध्वस्त करण्यासाठी ही स्फोटके पुरेशी होती.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, केंद्र सरकारने यापूर्वी २०२० साली यावर भाष्य केले होते. लव्ह जिहादला विद्यमान कायद्याअंतर्गत परिभाषित केलेले नाही. तसेच केंद्रीय यंत्रणांनी अशाप्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झालेली नाही, असे सांगितले होते. सरकारने संसदेत माहिती देताना सांगितले की, संविधानाच्या कलम २५ नुसार, प्रार्थना करण्याचे, धर्माचे आचरण करण्याचे, धर्म स्वीकारण्याचे आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला देण्यात आले आहे.
पीसी जॉर्ज यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी टीव्ही चॅनेलच्या चर्चेदरम्यान अल्पसंख्याक समुदायाविरोधात चिथावणीखोर भाष्य केले होते. त्यामुळे त्यांना अटकही झाली होती. त्यायालयीन कोठडी सुनावण्यातर त्यांना २८ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता.