केरळमध्ये पुन्हा एकदा महात्मा गांधी यांची हत्या आणि गुजरात दंगल याविषयी विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे. कारण या दोन्ही घटनांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. एनसीआरटीने पुस्तकांमधून या दोन्ही घटना वगळल्या होत्या. मात्र त्यांच्या नियमांना छेद देत या घटनांचा समावेश पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. ही पुस्तकं छापून तयार आहेत आणि सप्टेंबरमध्ये या पुस्तकांचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री वी. शिवनकुट्टी यांनी सांगितलं की एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांमधून जो अभ्यासक्रम हटवण्यात आला होता त्याचा समावेश आम्ही पुन्हा पुस्तकांमध्ये केला आहे असं सांगितलं आहे.
सध्या केरळमधल्या शाळांना ओणमची सुट्टी आहे. त्या सुट्टीवरून विद्यार्थी जेव्हा परत येतील तेव्हा या दोन घटनांचा समावेश असलेली पाठ्यपुस्तकं वितरीत करण्यात येणार आहेत. एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये काही भाग वगळण्यात आला होता. मात्र आता आम्ही महात्मा गांधींची हत्या, नेहरुंचा काळ, त्या दरम्यान झालेल्या सामाजिक सुधारणा आणि गुजरात दंगे या विषयांचा समावेश या पुस्तकांमध्ये केला आहे. शाळांच्या पाठ्यपुस्तक समितीने या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. तसंच त्यांनी आम्हाला शिफारस केली होती की या पुस्तकांमध्ये गांधी हत्या, गुजरात दंगल यासारख्या घटनांचा उल्लेख यायला हवा. ओणमच्या सुट्टीवरुन विद्यार्थी आले की ही पुस्तकं त्यांना देण्यात येतील. परीक्षांमध्ये या विषयांवर प्रश्नही विचारले जातील असंही मंत्री शिवनकुट्टींनी स्पष्ट केलं.
अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांमधून हे विषय बदलण्यात आले होते. मात्र आता इतिहास आणि राज्या शास्त्र या विषयांमध्ये या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. एनसीईआरटीने या दोन विषयांमधून ज्या घटना वगळल्या होत्या त्यांचा समावेश या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.