जाती-धर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावांचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समाजिक समस्यांचा सामना गेल्या कित्येक वर्षांपासून भारताला करावा लागत आहे. पण यात वर्णभेदाच्या समस्येचाही प्रामुख्याने समावेश करावा लागेल, असं चित्र सध्या दिसून येत आहे. केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांनी फेसबुकवर नुकत्याच लिहिलेल्या एका सविस्तर पोस्टमध्ये ही बाब अधोरेखित होत आहे. त्यांना स्वत:ला आलेल्या या धक्कादायक अनुभवानंतर ही पोस्ट सध्या व्हायरल होऊ लागली आहे.
काय म्हटलंय या पोस्टमध्ये?
शारदा मुरलीधरन या ५९ वर्षीय सनदी अधिकारी केरळच्या मुख्य सचिवपदी कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. व्ही. वेणू हेदेखील सनदी अधिकारीच होते. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी ते सेवानिवृत्त झाले. तेदेखील केरळचे मुख्य सचिव होते. त्यांच्याकडून ही सूत्र थेट त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे आली. तेव्हापासून शारदा मुरलीधरन या केरळच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार पाहतात. पण पदभार स्वीकारल्यापासून आपल्याला रंगावरून लोकांच्या डिवचण्याचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक बाब त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केली आहे.
“माझ्या मुख्य सचिवपदाच्या कार्यकाळाबाबत एक कमेंट मी ऐकली. ‘तुझ्या नवऱ्याची कारकिर्द जितकी गोरी, तितकी तुझी काळी’ अशी ती कमेंट होती. मी ही कमेंट का सांगितली? मला या पोस्टचं वाईट तर नक्कीच वाटलंय. पण गेल्या सात महिन्यांत माझ्या पतीशी माझी सातत्याने तुलना केली जात आहे. मला काळ्या रंगाचं लेबल लावलं गेलं (त्यात मी एक महिला आहे ही बाबही होतीच!). जणूकाही ही अशी बाब आहे जिची मला लाज वाटायला हवी. काळा म्हणजे फक्त काळा रंग नाही, काळा म्हणजे दुष्ट, काळा म्हणजे निराश, काळा म्हणजे क्रूर असंच समीकरण झालंय”, असं शारदा मुरलीधरन यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
“मी चार वर्षांची असताना माझ्या आईला म्हणाले होते की ती मला पुन्हा तिच्या पोटात घेऊन नव्याने गोरी आणि सुंदर बनवू शकेल का. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ माझा रंग प्रचलित मान्यतेमध्ये ‘सु्ंदर’ समजला जाणारा नाही याच दूषणांच्या ओझ्याखाली जगत आलेय. काळा रंग चांगला नसतो, हेच माझ्यावर ठसवलं गेलं. काळ्या रंगात सौंदर्य किंवा मूल्य नसतात याच समजुतीनिशी लहानाची मोठी झाले. गोऱ्या रंगाला महत्त्व देत राहिले. गोरा रंग, गोरं मन असं जे काही गोरं आहे, तेच श्रेष्ठ मानत राहिले. ते मी नाही यासाठी कायम स्वत:ला कमी लेखत आले. पण या सगळ्याची कुठेतरी नुकसानभरपाई व्हायला हवी होती”, अशा शब्दांत शारदा मुरलीधरन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“माझ्या मुलांनी काळ्या रंगातलं सौंदर्य शोधलं”
आपल्या मुलांनी काळ्या रंगातलं सौंदर्य आपल्या निदर्शनास आणून दिलं, असं शारदा श्रीधरन म्हणाल्या आहेत. “माझ्या मुलांना त्यांच्या काळ्या रंगात कमीपणा वाटत नाही. जिथे मला सौंदर्य सापडलं नाही, तिथे त्यांना ते सापडलं. काळा रंग सुंदर आहे हा विचार त्यांनी मला समजावला. काळा रंग सुंदर आहे, काळा रंग अप्रतिम आहे ही दृष्टी माझ्या ठायी निर्माण करण्यासाठी त्यांनी मला मदत केली”, असं आपल्या पोस्टच्या शेवटी शारदा मुरलीधरन यांनी म्हटलं आहे.
शारदा श्रीधरन यांनी लिहिलेल्या या पोस्टवर नेटिझन्सकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या पोस्टवर आत्तापर्यंत ३ हजाराहून जास्त लाईक्स, ७०० हून अधिक कमेंट्स आल्या असून ८०० हून अधिक युजर्सनं ही पोस्ट शेअर केली आहे. काही युजर्सनं ‘काळा रंग सुंदर आहे’ अशा कमेंट केल्या आहेत. तर काही युजर्सनं काळ्या रंगाबाबत ट्रोल करणाऱ्या व्यक्तींकडे साफ दुर्लक्ष करण्याचा सल्ला शारदा यांना दिला आहे.