Sarada Murleedharan Facebook Post: गेल्या दोन दिवसांपासून केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. शारदा मुरलीधरन यांनी त्यांच्या रंगामुळे त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या ट्रोलिंगबाबत या पोस्टमध्ये सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच, या पोस्टमधून त्यांची त्यांच्या पतीशी कामाच्या बाबतीत नसून रंगाच्या बाबतीत होणारी तुलना वेदनादायी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता या पोस्टसंदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाल्या शारदा मुरलीधरन?
शारदा मुरलीधरन या केरळ राज्याच्या मुख्य सचिव असून राज्यातील सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये त्यांना एका व्यक्तीने ‘तुझ्या पतीची कारकीर्द जितकी गोरी, तितकी तुझी काळी’, अशा शब्दांमध्ये रंगावरून ट्रोल केलं होतं. यावर पोस्टमध्ये संताप व्यक्त केल्यानंतर त्याबाबत त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
“एकतर एक महिला म्हणून तुमचं कुणी ऐकून घेणं आधीच कठीण असतं. त्यातही जर तुम्ही काळ्या रंगाची महिला असलात तर मग तुमचं अस्तित्वच शून्य आहे. त्यांच्यासाठी तुम्ही अस्तित्वातच नाही आहात. भारतीयांचं त्वचेच्या रंगाबाबतचं प्रेम हे इथल्या जातीव्यवस्थेमध्ये मुरलेलं आहे. तथाकथित खालच्या मानल्या जाणाऱ्या जातीतील किंवा आत्यंतिक गरीब असणाऱ्या लोकांना काळ्या रंगाचे मानलं जातं. आपल्याला अनेक प्रकारचे पूर्वग्रह असतात?”, असं शारदा मुरलीधरन यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
जात का जाहीर केली नाही?
दरम्यान, शारदा मुरलीधरन यांनी त्यांची जात जाहीर केली नसल्याचा मुद्दाही चर्चेत आल्यानंतर त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. “माझ्या बाबतीत सांगायचं तर मी माझी जात जाहीर केलेली नाही हे खरं आहे. त्यामुळेच माझ्या बाबतीत नेहमी मुद्दा उपस्थित होतो की जातीच्या उतरंडीमध्ये मला नेमकं कुठल्या स्थानावर ठेवायचं? एकतर त्यांना वाटतं की मी मल्याळी नाही. मग त्यांना माझं नाव वाचून वाटतं की मी उच्च जातीतील असेन. पण मग मी ‘उच्च जातीतल्यांसारखी’ दिसत नाही म्हणून मग त्यांचा जास्तच संभ्रम होतो”, अशी टिप्पणी शारदा मुरलीधरन यांनी या मुद्द्यावर केली आहे.
“अगदी तुम्ही नोकरशाहीच्या चौकटीत सर्वात उच्च स्थानावर का असेनात, तरीसुद्धा हा प्रश्न येतोच की कुणाला बोलण्याची सर्वाधिक संधी मिळते, कुणाला बोलू दिलं जात नाही आणि कुणाचं ऐकून घेतलं जातं. जर तुम्ही असा कोणत्याही व्यवस्थेत उच्चपदावर नसाल, तर तुमचं ऐकून घेतलं जाणं अत्यंत कठीण होऊन बसतं. कुणाला आपले मुद्दे सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळते हे महत्त्वाचं आहे”, असंही शारदा मुरलीधरन यांनी नमूद केलं आहे.

शारदा मुरलीधरन यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय?
शारदा मुरलीधरन यांनी मंगळवारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये काळ्या रंगाबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे. “माझ्या मुख्य सचिवपदाच्या कार्यकाळाबाबत एक कमेंट मी ऐकली. ‘तुझ्या नवऱ्याची कारकिर्द जितकी गोरी, तितकी तुझी काळी’ अशी ती कमेंट होती. मी ही कमेंट का सांगितली? मला या पोस्टचं वाईट तर नक्कीच वाटलंय. पण गेल्या सात महिन्यांत माझ्या पतीशी माझी सातत्याने तुलना केली जात आहे. मला काळ्या रंगाचं लेबल लावलं गेलं (त्यात मी एक महिला आहे ही बाबही होतीच!). जणूकाही ही अशी बाब आहे जिची मला लाज वाटायला हवी. काळा म्हणजे फक्त काळा रंग नाही, काळा म्हणजे दुष्ट, काळा म्हणजे निराश, काळा म्हणजे क्रूर असंच समीकरण झालंय”, असं मुरलीधरन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“मी चार वर्षांची असताना माझ्या आईला म्हणाले होते की ती मला पुन्हा तिच्या पोटात घेऊन नव्याने गोरी आणि सुंदर बनवू शकेल का. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ माझा रंग प्रचलित मान्यतेमध्ये ‘सु्ंदर’ समजला जाणारा नाही याच दूषणांच्या ओझ्याखाली जगत आलेय. काळा रंग चांगला नसतो, हेच माझ्यावर ठसवलं गेलं. काळ्या रंगात सौंदर्य किंवा मूल्य नसतात याच समजुतीनिशी लहानाची मोठी झाले. गोऱ्या रंगाला महत्त्व देत राहिले. गोरा रंग, गोरं मन असं जे काही गोरं आहे, तेच श्रेष्ठ मानत राहिले. ते मी नाही यासाठी कायम स्वत:ला कमी लेखत आले”, असंही त्यांनी नमूद केलं आहे.