मागील जवळपास ७० दिवसांपासून भारतातील ईशान्यकडील राज्य असणाऱ्या मणिपूरमध्ये अशांतता आहे. ३ मे २०२३ पासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. या राज्यातून दररोज अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत, त्यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. यानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तिरुवनंतपुरममध्ये जारी केलेल्या निवेदनात विजयन म्हणाले की,”देशातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की, संघ परिवाराच्या (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) अजेंड्यामुळे मणिपूरचं दंगलग्रस्त भूमीत रुपांतर झालं आहे. संघ परिवाराकडून तिथे द्वेषाची पेरणी केली जात आहे. दंगलीच्या नावाखाली मणिपूरमध्ये ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य केलं जात आहे. ख्रिश्चन आदिवासी समुदायाच्या चर्चवर हल्ले केले जात आहेत.”
हेही वाचा- Manipur Horror: दोन महिलांना नग्न करत काढली धिंड, सामूहिक बलात्काराचा आरोप
पिनराई विजयन पुढे म्हणाले, “मणिपूरमधून दररोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत. मानवी सदसद्विवेक बुद्धीला लाजवणारे अत्यंत भयानक दृश्य मणिपूरमधून वारंवार समोर येत आहे. हिंसाचाराच्या सुरुवातीच्या दिवसांचे काही दृश्य आता समोर आली आहेत. कुकी समुदायातील महिलांना हिंसक जमावाने अत्यंत घृणास्पद आणि क्रूर पद्धतीने वागणूक दिली आहे.”
हेही वाचा- “आधी भावाची हत्या केली मग बहिणीला नग्न करत धिंड काढली”, मणिपूरमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं?
“मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे लोक कर्तव्य बजावत आहेत, तेच लोक हिंसाचाराला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचं मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आता उघडा पडत आहे. जातीय ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना पराभूत करणं, ही लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे,” असंही मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले.