Empuraan Movie Controversy: मल्याळम अभिनेते मोहनलाल अभिनित आणि पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित एम्पूरन हा चित्रपट प्रदर्शित झाला असून केरळसह विदेशात या चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे. चित्रपटामध्ये गुजरातमध्ये झालेली २००२ ची दंगल आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरासंबंधी काही संदर्भ दिले आहेत, त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी संघ परिवाराने सोशल मीडियावरून टीका केली. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. उजव्या विचारसरणीच्या राजकारणाला चित्रपटात खलनायक ठरविले गेले असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे.
या चित्रपटाने संघाचा अजेंडा उघड केल्याबद्दल केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) आणि प्रमुख विरोधक काँग्रेस चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करत आहे. तर उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून एम्पूरनवर जोरदार टीका होत आहे. काहींना या चित्रपटाला हिंदू विरोधी आणि हिंदूविरोधी प्रचार करणारा चित्रपट म्हटले आहे.
काँग्रेसने काय म्हटले?
केरळमधील काँग्रेसच्या नेत्यांकडून चित्रपटाला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. केरळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पलक्कडचे आमदार राहुल ममकुट्टाथिल यांनी मोहनलाल आणि दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. ममकुट्टाथिल यांनी लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, एम्पूरन चित्रपटाने केरळची प्रादेशिक अस्मिता जपली आहे. ज्याप्रकारे केजीएफ आणि पुष्पा चित्रपटाने त्या त्या राज्याची अस्मिता जपली होती.
‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे कौतुक करणारे आज विरोधात
ममकुट्टाथिल पुढे म्हणाले की, आज एम्पूरनवर टीका करणारे हे तेच लोक आहेत ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली द काश्मीर फाइल्स आणि द केरल स्टोरी चित्रपटांचे कौतुक केले होते. त्यांनी केलेली टीका ही त्यांचीच दुटप्पी वृत्ती उघड करत आहे. तसेच मोहनलाल यांच्याविरोधात पद्धतशीर द्वेष पसरविण्याची मोहीम चालविणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. भूतकाळातील कलंक हे सहजासहजी पुसले जात नाहीत, असे विधान करत त्यांनी राजकीय वादावर भाष्य केले.
केरळ काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार व्हीटी बलराम यांनी मात्र राजकीय आशय असलेल्या मल्याळम चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. केरळ काँग्रेसनेही त्यांच्या एक्स हँडलवरही एक पोस्ट टाकली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, केरळमध्ये कधीही पाऊल न ठेवलेल्या लोकांनी दावा केला होता की, त्यांचा कर मुक्त असलेला सी-ग्रेड प्रचारकी चित्रपट केरळची खरी गोष्ट होता.
उजव्या विचारसरणीच्या संघटनांचे म्हणणे काय?
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, काही हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाला हिंदू विरोधी म्हटले आहे. पृथ्वीराज सुकुमारन यांनी असा चित्रपट तयार करून मोहनलाल आणि त्यांच्या चाहत्यांना फसवले आहे. हिंदू पोस्ट, या हिंदुत्ववादी सोशल मीडिया हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, एम्पूरन हा हिंदू विरोधी प्रचार असलेला चित्रपट असल्याचे उघड झाले आहे. भारत आणि उपखंडात (बांगलादेश) हिंदूवर अनन्वित अत्याचार होत असताना हिंदूंनाच खलनायक दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.